मंगळवार पेठ होर्डिंग अपघात: अटकेत असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांना 11 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2018 01:50 PM2018-10-06T13:50:55+5:302018-10-06T18:08:16+5:30
या समितीतील वरिष्ठ अधिकारी शनिवारी सकाळी पुण्यात दाखल झाले. रेल्वेच्या पुणे विभागाकडून दुर्घटनेचे खापर ठेकेदारावर फोडले जात असल्याने ही समिती नेमके कोणाला दोषी धरणार याकडे लक्ष लागले आहे.
पुणे : मंगळवार पेठ परिसरातील शाहीर अमर शेख चौकात होर्डिंग कोसळल्याच्या घटनेची मध्य रेल्वेच्या उच्चस्तरीय समितीकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. या समितीतील वरिष्ठ अधिकारी शनिवारी सकाळी पुण्यात दाखल झाले. या प्रकरणी अटकेत असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांना 11 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
रेल्वेच्या जागेतील लोखंडी होर्डिंगचा सांगाडा कोसळून शुक्रवारी दुपारी चार जणांचा मृत्यू झाला आहे. होर्डिंग काढत असताना निष्काळजीपणा केल्याने ही दुर्घटना घडल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. पण होर्डिंगच्या मुद्दावरून आता महापालिका, रेल्वे प्रशासन, ठेकेदार, होर्डिंग एजन्सी यांमध्ये टोलवाटोलवी सुरू झाली आहे. सर्व यंत्रणा एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. पालिकेकडून रेल्वेला संबंधित होर्डिंग काढण्याबाबत सातत्याने पत्रव्यवहार केला आहे. तसेच होर्डिंग एजन्सीनेही हे होर्डिंग काढण्याची परवानगी मागितली होती. पण रेल्वे प्रशासनाकडून ही परवानगी देण्यात आली नाही. रेल्वेकडूनच ठेकेदारामार्फत होर्डिंग काढण्याचे काम सुरू होते. मात्र, त्यासाठी पोलिस तसेच पालिकेलाही कळविण्यात आले नव्हते. त्यामुळे ठेकेदाराप्रमाणेच रेल्वेतील अधिकारीही तेवढेच जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी अभियंत्यासह एकाला अटकही केली आहे.
या घटनेनंतर रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांनी शुक्रवारी संबंधित ठेकेदाराने निष्काळजीपणा केल्याने घटना घडल्याचे स्पष्ट केले. तसेच समितीकडून या घटनेची चौकशी करण्याची घोषणाही केली होती. त्यानुसार मध्य रेल्वेचे उप मुख्य अभियंता ए. के. सिंग, उप मुख्य सुरक्षा अधिकारी शिवकुमार आणि उप मुख्य वाणिज्य व्यवस्थापक के. व्ही. थॉमस शनिवारी सकाळी मुंबई येथून पुण्यात आले आहेत. त्यांच्यासह पुणे विभागाचे वरिष्ठ सुरक्षा आयुक्त डी. विकास यांनी या दुर्घटनेची चौकशी सुरू केली आहे. पुढील एक-दोन दिवसात समितीची चौकशी पुर्ण होण्याची शक्यता आहे. चौकशीमध्ये समिती कोणाला जबाबदार धरणार की नेहमीप्रमाणे कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर खापर फोडले जाणार याबाबत रेल्वे वर्तुळात तर्कवितर्क लढविले जात आहेत