आरक्षणप्रश्नी सर्वपक्षीय बैठक घ्या- शरद पवार; तेच बैठकीला नव्हते- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 05:51 AM2024-08-13T05:51:06+5:302024-08-13T05:51:59+5:30
आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा वाढविण्याचे केंद्राला आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: ‘मराठा आरक्षण या विषयावर सर्वपक्षीय बैठक बोलवावी, त्या बैठकीला मराठा समाजाचे मनोज जरांगे, ओबीसी समाजाचे छगन भुजबळ, लक्ष्मण हाके यांनाही बोलवावे, त्या संयुक्त बैठकीत चर्चा करून या विषयावर मार्ग काढण्याची भूमिका घ्यावी,’ अशी सूचना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली.
सोमवारी मराठा समाजाच्या काही कार्यकर्त्यांनी पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर पवार म्हणाले, राज्यातील सामाजिक वातावरणात कटुता निर्माण होऊ नये, यासाठी सर्वांनी जबाबदारीने वागले, बोलले पाहिजे. सर्वपक्षीय बैठक हा या विषयावरचा चांगला उपाय आहे. ५० टक्क्यांवर आरक्षण देता येत नाही, असा निर्णय न्यायालयाने या संदर्भात दिला आहे. महाराष्ट्रातील सर्वांनी एकत्र येऊन केंद्र सरकारकडे यावर भूमिका मांडावी. ५० टक्क्यांवर आरक्षण द्यायचे, हा अधिकार केंद्र सरकारकडे आहे, संसदेकडे आहे. केंद्राने यात पुढाकार घेतला, तर आमचे पूर्ण सहकार्य त्यांना राहील.
दोन समाजांत संघर्ष नको : मुख्यमंत्री शिंदे
मुंबई: आम्ही सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मात्र ते बैठकीला आले नाही. दोन समाजात वाद निर्माण होऊ नये, हीच आमची भूमिका आहे. यासाठी हवे ते सर्व करायला तयार असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांना प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, आम्ही सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मात्र संध्याकाळपर्यंत येणार येणार असे बोलत राहिले. मात्र ते आले नाहीत. राज्यात समाजात संघर्ष नको अशी सरकारची प्रामाणिक भूमिका आहे. शरद पवार मला भेटले त्यावेळी देखील मी त्यांना हेच सांगितले की, निवडणुका येत असतात जात असतात, सरकार येत असतात जात असतात, मात्र महाराष्ट्रातील संस्कृती, परंपरा याला बाधा येता कामा नये.
बैठक मोजक्यांचीच घ्या: छगन भुजबळ
सर्वपक्षीय बैठक बोलवण्याबाबत शरद पवारांनी केलेल्या विधानाचे मी स्वागत करतो. पण सर्वपक्षीय बैठक मोजक्या लोकांची घ्यावी, ज्यात मोकळेपणाने सर्व पक्षाच्या नेत्यांना बोलता येईल. उगीच ५०-१०० लोक बोलवले तर बैठकीला न्याय मिळत नाही, असे अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांना सांगणार असल्याचेही ते म्हणाले.
जरांगेंनी धुडकावला बैठकीचा प्रस्ताव
अहमदनगर : मराठ्यांनी आतापर्यंत अनेक नेते आणि पक्ष मोठे केले. पण, मराठ्यांवरच अन्याय झाला. आरक्षणासाठी मराठे एकत्र आल्याने सर्वांचेच धाबे दणाणले आहेत. मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून सत्ताधारी व विरोधक एकत्र आलेत. षडयंत्र रचले जात आहे, असा आरोप करत मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सर्वपक्षीय बैठकीचा प्रस्ताव धुडकावला.