ताब्यात ठेवा रक्तदाब
By admin | Published: May 14, 2017 02:54 AM2017-05-14T02:54:50+5:302017-05-14T02:54:50+5:30
१७ मे रोजी असलेल्या ‘हायपरटेन्शन डे’ ची थीमच आहे, जाणून घ्या तुमचा रक्तदाब.
- डॉ. स्वाती गाडगीळ
रक्तदाबाकडे केलेलं दुर्लक्ष महागात पडू शकतं, हेच अनेक जण गांभीर्याने घेत नाहीत. अतिताण, बदललेली लाइफस्टाइल, अपुरी झोप, व्यायामाचा अभाव, स्वत:च स्वत:वर केलेले उपचार असा अनेक कारणांमुळे रक्तदाब नियंत्रणाबाहेर जाऊ शकतो. तो नियंत्रणात ठेवण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला जसा ऐकायला हवा, तशाच काही सवयीही बदलायला हव्यात. त्यामुळेच १७ मे रोजी असलेल्या ‘हायपरटेन्शन डे’ ची थीमच आहे, जाणून घ्या तुमचा रक्तदाब. त्यानिमित्त...
सकाळी ७ वाजता सुरू झालेली शस्त्रक्रिया १२ तास चालेल, हा अंदाज सगळ्या टीमला आधीच दिला होता. त्याप्रमाणे संध्याकाळी ७ वाजता मी पेशंटला आयसीयूमध्ये हलवून तिथल्या डॉक्टरला सगळ्या सूचना देऊन घरी आले. तोवर रात्रीचे ९ वाजले होते. अचानक कुणीतरी धावत जिना चढल्याचा आवाज आला आणि आमची बेल घणाघणा वाजली. खालच्या मजल्यावरचा सुशांत घाबराघुबरा माझ्यासमोर उभा होता. भराभरा काहीतरी सांगू लागला, ‘तुम्ही खाली चला’ एवढंच मला कळलं. मी त्याच्या घरी गेले. बघते तर काय, त्याचे बाबा जमिनीवर पडले होते. शुद्ध हरपली नव्हती; पण बोलू शकत नव्हते आणि उठता येत नव्हतं. जुजबी तपासणी करून माझ्या लक्षात आलं की, स्ट्रोक आला आहे. अर्धांगवायूचा झटका आला होता. अॅम्ब्युलन्स बोलावून ताबडतोब त्यांना चांगल्या रुग्णालयात हलवलं. आयसीयूच्या बाहेर बसलेल्या सुशांत व त्याच्या आईला धीर देऊन मी घरी आले. तोपर्यंत त्यांचे इतर नातेवाइकसुद्धा आले होते. मला रात्रभर झोप लागली नाही. दिवसभराच्या थकव्याची जाणीवदेखील नव्हती. मनात सारखा एकच विचार होता की, सुशांतच्या वडिलांना या आघातापासून नक्की वाचवता आलं असतं. पण, त्यासाठी त्यांच्या सहकार्याची व इच्छाशक्तीची गरज होती. त्यांनी आपला हेकेखोरपणा सोडून डॉक्टर काय सांगतात, ते ऐकायला हवं होतं...
बरोबर तीन वर्षांपूर्वी दिनकरकाकांचं ब्लड प्रेशर वाढलं आहे, हे प्रथम लक्षात आलं होतं. अचानक भयंकर डोकं दुखतंय, असं म्हणत अक्षरश: ते लोळू लागले होते. तेव्हादेखील त्यांना अॅडमिट करून रक्तदाब कमी करायला तीनचार दिवस गेले. शिवाय, घरी आल्यावर मी नीट समजावून सांगितलं होतं की, औषधं वेळेवर आणि नियमित घेणे आवश्यक आहे. दुर्लक्ष करून चालणार नाही. तरीही, नको तो प्रसंग ओढवलाच. १६०, १७० वरचं बीपी आणि खालचं १००, ११० एवढं जास्त असलं तरीसुद्धा ते कुणाचंच ऐकायचे नाही. हट्टी स्वभाव, तशातच तापटपणा, शिवाय आॅफिसमध्ये मोठ्या हुद्द्यावर असल्याने सततची टेन्शन्स, कधी पार्ट्या, अपेयपान, तळकट-तिखट खाणं, लेट नाइट्स... एक ना दोन, शक्य तेवढी प्रतिकूल परिस्थिती होती. तरीसुद्धा, लहान तोंडी मोठा घास म्हणावं तसं मी त्यांना रागावले. वजन, व्यसन आणि आहाराकडे लक्ष द्यायलाच हवं, हे निक्षून सांगितलं. भूलतज्ज्ञ असल्यामुळे माझं तर आयुष्यच जणू या पल्स-बीपीच्या जोडीशी बांधलं गेलंय! रोज प्रत्येक पेशंटला भूल देण्यापूर्वी तपासताना सगळं बघावं लागतं. काही आजार आहे का, ज्यासाठी रोज औषधं घ्यावी लागतात, असं विचारल्यावरसुद्धा काही जण रक्तदाब व मधुमेहाबद्दल सांगत नाहीत. रिपोर्ट्स पाहिल्यावर व खोदून प्रश्न विचारले की, हळूच गाठोडीतून एकेक उत्तरं बाहेर येतात. वर हे स्पष्टीकरण दिलं जातं की, बीपी नॉर्मल असतं म्हणून सांगितलं नाही. सगळ्यांनी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी की, उच्च रक्तदाब आणि मधुमेह हे अतिशय घातक आजार आहेत. शरीरातील महत्त्वाच्या अवयवांवर हे आजार फार हानिकारक परिणाम करू शकतात, पण ते न होऊ देणं किंवा त्यांची तीव्रता कमी करणं आपल्याच हातात आहे . ब्लड प्रेशर वाढल्यास तीव्र डोकेदुखी, मेंदूत रक्तस्राव होणे, मूत्रपिंडाचे कार्य बंद पडणे, हृदयाला सूज येणे व बंद पडणे अर्थात हार्ट फेल्युअर होणे, असे जीवावर बेतणारे परिणाम होऊ शकतात, हे सदैव लक्षात असावे. हा फारच महत्त्वाचा मुद्दा आहे. मला, इतकी वर्षं वैद्यकीय पेशात असूनही एका गोष्टीचं उत्तर मिळालं नाही की, ब्लड प्रेशर वाढलं की, त्या व्यक्तीस स्वत:ला ते कसं कळतं आणि आत्मविश्वासाने असे लोक औषधं स्वत:च्या मनाने सुरू करतात व बंदही करू शकतात! डायबेटीसचे रुग्ण गोड खाल्लं की, औषध दुप्पट घेतात म्हणे. भीती कशी वाटत नाही, डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय असं काही करताना? बरं, त्यांच्या युक्तिवादासमोर मोठ्यातला मोठा डॉक्टरसुद्धा गोंधळून जाईल, इतक्या ठामपणे ते आपली मतं मांडत असतात. २०१० सालच्या अहवालाप्रमाणे, त्या वर्षी जगातील १६ ते ३७ टक्के लोकं हायपरटेन्शनने अर्थात उच्च रक्तदाबाने ग्रस्त होते व १८ टक्के मृत्यूंचं कारण उच्च रक्तदाब होतं! आजची बदललेली जीवनशैली या आजाराच्या वाढत्या प्रमाणास आणि त्याच्या भयंकर परिणामास कारणीभूत आहे. तरुण वयातच हाय ब्लड प्रेशर, हृदयाचे विकार, क्वचित हार्ट अॅटॅकसुद्धा येतो, हे आपण रोजच ऐकतो, पाहतो आणि आम्ही डॉक्टर्स या आव्हानांना रोज तोंड देत असतो. वाढता ताणतणाव व तो समर्थपणे झेलण्याची क्षमता नसल्यास उद्भवणारी गुंतागुंतीची परिस्थिती आजच्या ढासळत्या आरोग्यास कारणीभूत आहे. मल्टीनॅशनल कंपनीसाठी काम करणारे रात्रीचा दिवस करून आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करीत असतात. अपूर्ण झोप, वेळीअवेळी खाणे, तळकट-तिखट-फास्ट फूडवर दिवस काढणे व रात्री उशिरा जेवणे, जेवल्यावर लगेचच झोपणे आणि या सगळ्या कुपथ्याच्या जोडीला व्यायामाचा अभाव किंवा अतिरेक, निर्विवादपणे आजच्या ढासळलेल्या आरोग्यास जबाबदार आहे. मी व्यायामाचा अतिरेक म्हटलं, ते अगदी खरं आहे. पाहावं तो मॅरेथॉन धावण्यासाठी आटापिटा करताना दिसतो. आपली नियमित वैद्यकीय तपासणी केल्याशिवाय आणि व्यावसायिक मार्गदर्शकाच्या देखरेखीशिवाय व्यायामाचा अतिरेक करणं नक्कीच घातक ठरू शकतं. चांगल्या आरोग्यासाठी सगळ्यात महत्त्वाची बाब आहे, रात्री सात तास झोप मिळणे. शरीराला व मनाला आराम देण्यासाठी ही झोप आवश्यक असते. आहारावर नियंत्रण असणे आणि त्यायोगे वजन आटोक्यात ठेवणे अपरिहार्य आहे. मिठाचं प्रमाण जेवणात बेताचं हवं आणि पापड- लोणची ज्यामध्ये तेल, मीठ व पापडखार असतो, असे पदार्थ रोज खाणे टाळावे. फळं आणि भाज्या योग्य त्या प्रमाणात तुमच्या आहारात असल्या पाहिजेत. अर्थात, आपल्या पूर्वजांनी घालून दिलेल्या नियमानुसार पोळीभाजी, भातआमटी, लिंबू, चटणीकोशिंबीर व थोडं साजूक तूप असा चौरस आहार असावा. आजच्या यंत्रयुगात आपली सगळी कामं चुटकीसरशी होतात. खूप व्यायाम करायला वेळ नसला, तरी आपण काही सोप्या गोष्टी नक्कीच करू शकतो. घरी किंवा आॅफिसमध्ये खाली उतरताना लिफ्टचा वापर टाळावा व किमान एकदा जिन्याने चढून जावे. चालत जाता येण्यासारखे अंतर असल्यास वाहनाचा वापर टाळावा. रात्री ७ च्या आत जेवावे. दारू व तंबाखूचे सेवन टाळावे. धूम्रपान निश्चितच करू नये. दरवर्षी, किमान एकदा वैद्यकीय चाचणी करण्याने अचानक उद्भवणारे धोके टाळता येऊ शकतात.
हा आजार सुखवस्तू लोकांनी अभिमानाने मिरवण्याचा दागिना नसून एखाद्या महाविनाशकारी अणुबॉम्बसारखा आहे. ज्याची टिकटिक ऐकूनदेखील दुर्लक्ष केल्यास, दु:खास आमंत्रण नक्की, हे समजणे आवश्यक आहे. मी तुम्हाला घाबरवण्यासाठी हे सांगत नाही, तर प्रत्येकाने स्वत:च्या रक्तदाबाबद्दल सतर्क असावं आणि जाणीवपूर्वक हायपरटेन्शनला दूर ठेवावं एवढ्याचसाठी हा प्रपंच!
जागतिक आरोग्य दिन किंवा उच्च रक्तदाबाचा जागतिक दिवस, तो तुमच्या- आमच्यासाठी संदेश घेऊन येईल, तेव्हाच जाग यावी व चर्चासत्रांचं आयोजन व्हावं, ही दुर्दैवी बाब आहे. सेल्फ मेडिकेशन अर्थात आपल्या मनाने औषधोपचार करणे किंवा थांबवणे, योग्य त्या स्पेशालिस्ट डॉक्टरकडे न जाणे, वारंवार डॉक्टर बदलणे, आहारविहाराकडे दुर्लक्ष करणे, हे निश्चितच धोक्यास आमंत्रण आहे, हे विसरू नका. फाजील आत्मविश्वास कधीही अंगाशी येऊ शकतो.
जाताजाता एकच विनंती करते, आपलं ब्लड प्रेशर आजच तपासून घ्या आणि त्याची नोंद ठेवा!
आपणास आयुरारोग्य लाभो हीच प्रार्थना!