ओव्हरहेड वायरला हात लावा आणि २0 हजार रुपये कमवा

By admin | Published: January 21, 2017 06:03 AM2017-01-21T06:03:41+5:302017-01-21T06:26:48+5:30

लोकलच्या टपावरून स्टंट करताना ओव्हरहेड वायरचा शॉक लागून अनेक तरुण जीव गमावतात

Hold the overhead wire and earn 20 thousand rupees | ओव्हरहेड वायरला हात लावा आणि २0 हजार रुपये कमवा

ओव्हरहेड वायरला हात लावा आणि २0 हजार रुपये कमवा

Next

सुशातं मोरे,

मुंबई- लोकलच्या टपावरून स्टंट करताना ओव्हरहेड वायरचा शॉक लागून अनेक तरुण जीव गमावतात किंवा गंभीर जखमी होतात. मात्र हेच स्टंट करण्यासाठी ‘बेटिंग’ लागत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ओव्हरहेड वायरला हात लावा आणि २0 हजार रुपये मिळवा, अशा प्रकारचे बेटिंग काही तरुणांमध्ये लागत आहे. याचबरोबर लोकल प्रवासात अन्य काही ‘स्टंट’साठीही बेटिंग लागत असून, यामुळे तरुणांच्या जिवास धोका निर्माण होत आहे. यासंदर्भात मध्य रेल्वे आरपीएफकडून (रेल्वे सुरक्षा दल) अधिक तपास केला जात आहे.
लोकलच्या टपावरून प्रवास करणे धोकादायक असून, २५ हजार व्होल्ट क्षमतेचा वीजप्रवाह जात असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून सर्व स्थानकांवर दिली जाते. तरीही याकडे दुर्लक्ष करत अनेक तरुण टपावरून प्रवास करतात आणि ओव्हरहेड वायरचा धक्का लागल्यावर जीव गमावतात किंवा गंभीर जखमी होतात. ओव्हरहेड वायरचा शॉक लागून २0१६मध्ये रेल्वेच्या मेन लाइन आणि हार्बरवर २७ जणांचा मृत्यू झाला, तर ३३ जण जखमी झाले. २0१५मध्ये मृत्यूचा हाच आकडा १७ होता; तर १८ जण जखमी झाले होते. महत्त्वाची बाब म्हणजे २0१६मधील जानेवारी महिन्यातच विजेचा धक्का लागून ३ जणांना जीव गमवावा लागला. त्यामुळे अपघातांचे प्रमाण पाहिल्यास ते वाढतच जात आहे. ओव्हरहेड वायरच्या विजेचा धक्का लागून सर्वाधिक अपघात हे वडाळा रेल्वे पोलीस ठाण्यांतर्गत होत असल्याची नोंद आहे.
त्यानंतर दादर, कुर्ला, डोेंबिवली स्थानकाचा नंबर लागतो. अपघातांमध्ये स्टंट करणाऱ्यांचेच प्रमाण अधिक असते. स्टंट करणाऱ्यांविरोधात आरपीएफकडून नेहमीच कारवाईचा बडगाही उचलला जातो. तरीही पुन्हा जैसे थेच परिस्थिती होते.
एकंदरीतच यासंदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. टपावरून काही तरुणांकडून स्टंट केले जातात. मात्र हे स्टंट करण्यासाठी ‘बेटिंग’लावली जाते.
मध्य रेल्वेमार्गावर काही तरुणांचे ग्रुप असून, त्यांच्याकडून धोकादायक स्टंटसाठी ‘बेटिंग’ लावले जात आहे. स्टंट करताना बेटिंग जिंकणाऱ्या तरुणाला एक विशिष्ट रक्कमही दिली जाते. टपावरून प्रवास करताना ओव्हरहेड वायरला हात लावला तर अशा तरुणाला २0 हजार रुपये मिळतात. मात्र सध्या ओव्हरहेड वायरमधून २५ हजार व्होल्ट क्षमतेचा वीजप्रवाह जात असल्याने यात मृत्यूशी गाठच अधिक असते. त्यामुळे गंभीर जखमी झालेला तरुण ही रक्कम घेऊन जातो. या स्टंटसाठी विशिष्ट रक्कम दिली जात असतानाच आणखी काही स्टंटसाठीही बेटिंग लावली जात आहे.
लोकलच्या दरवाजाजवळ तरुण उभे राहतात आणि एखादा पूल येताच त्याच्या बाजूलाच असलेल्या भिंतीवरून किंवा पुलाच्या आधार असलेल्या पत्रावरून धावतात व पुन्हा लोकलमध्ये जातात. या स्टंटसाठी १० हजार रुपये रक्कम दिली जाते.
>मध्य रेल्वे आरपीएफचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त सचिन भालोदे यांना विचारले असता, एका बालगुन्हेगाराला नुकतेच ताब्यात घेण्यात आले होते त्या वेळी त्याने स्टंट करण्यासाठी बेटिंग लावले जात असल्याची माहिती दिली. मुळातच स्टंट करणे हे धोकादायक आहे आणि त्यामुळे अनेकांना प्राणही गमवावे लागत आहेत.
>खांबांना हात
लावण्यासाठीही पैसे
त्याचबरोबर मेन लाइन आणि हार्बरवर धावत्या ट्रेनमधून प्रवास करताना खांबांना हात लावण्यासाठी पैसे दिले जात असल्याचे सांगण्यात आले.२0१५ मध्ये पश्चिम व मध्य रेल्वेमार्गावर ओव्हरहेड वायरचा शॉक लागून १७ जण ठार झाले होते. यात मध्य रेल्वेमार्गावर १३ जणांचा समावेश आहे. मध्य रेल्वे मार्गावर खांबांना धडकल्यामुळे ६ जण ठार आणि ५२ जण जखमी झाल्याची नोंद आहे. २0१६ मध्ये मध्य रेल्वे मार्गावर ओव्हरहेड वायरचा शॉक लागून सर्वाधिक मृत्यूचे प्रमाण वडाळा रेल्वे पोलीस हद्दीत घडले होते. जवळपास ११ जण ठार झाल्याची नोंद आहे. तर खांबांना धडकून जखमी झालेल्या २५ जणांची नोंद झाली आहे.

Web Title: Hold the overhead wire and earn 20 thousand rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.