एक कोटी १८ लाखांची बिअर ताब्यात
By admin | Published: November 2, 2015 02:50 AM2015-11-02T02:50:03+5:302015-11-02T02:50:03+5:30
बुलडाणा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; आरोपींना सोमवारपर्यंंत पोलीस कोठडी.
बुलडाणा: राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या अधिकार्यांनी केलेल्या कारवाईत १ कोटी १८ लाख ४७ हजार ५00 रुपयांची बिअर ताब्यात घेऊन तीन आरोपींना अटक केल्याची कारवाई २९ ऑक्टोबर रोजी केली. याप्रकरणी तीनही आरोपींना २ नोव्हेंबरपर्यंंंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या पथकाला मिळालेल्या माहितीवरून या विभागाचे भरारी पथक तसेच दुय्यम निरीक्षक डिगंबर शेवाळे, त्यांचे सहकारी आणि प्रभारी निरीक्षक विकास पाटील, खामगावचे निरीक्षक विलास पाटील, मलकापूरचे उईके यांनी संयुक्तरीत्या नांदुरा-खामगाव रस्त्यावरील वडनेर भोलजी शिवारात ही कारवाई करून तीन ट्रक बिअर ताब्यात घेतली. सदर बिअरची किंमत १ कोटी १८ लाख ४७ हजार ५00 रुपये असून, तेलगंणा राज्यातील मल्लापल्ली येथून सदर बिअर हरियाणातील गुडगाव येथे जात होती. त्यांच्याजवळ इतर राज्यातून तसेच महाराष्ट्रातून बिअर वाहतुकीचा परवाना किंवा कागदपत्रे आढळून आले नाहीत. म्हणून बिअरच्या मालासह कमजराज सिंह, मनोज कुमार आणि अवतारसिंह जोगेंद्रसिंह रा. गुडगाव हरियाणा या तिघांना अटक केली.