Maharashtra Guidelines For Holi 2022: होळी, धुलिवंदनासाठी राज्य सरकारची नवी नियमावली जारी; ‘या’ गोष्टी पाळणे बंधनकारक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 12:54 PM2022-03-16T12:54:54+5:302022-03-16T12:55:57+5:30
Maharashtra Guidelines For Holi 2022: कोरोनाचे निर्बंध कमी झाले असले तरी होळी आणि धुलिवंदनासाठी राज्य सरकारने नवी नियमावली जारी केली आहे.
मुंबई: मराठी वर्षातील शेवटचा मोठा सण म्हणून होळी (Holi 2022) साजरी केली जाते. एकमेकांतील वैरभाव विसरून आनंदाची उधळण करण्याचा संदेश यातून दिला जात असल्याचे सांगितले जाते. देशभरात होळी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. फाल्गुन पौर्णिमेला होलिकादहन करून दुसऱ्या वर्षी धुलिवंदन केले जाते. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे धुलिवंदनाच्या उत्साहावर पाणी पडल्याचे चित्र दिसत आहे. कोरोनाचे निर्बंध कमी झाले असले तरी देखील होळी आणि धुलिवंदनासाठी राज्य सरकारने नवी नियमावली घोषित केली आहे.
यंदाच्या वर्षी १७ मार्च रोजी होलिकादहन आणि १८ मार्च रोजी धुलिवंदन आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे. यातील मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे सांगितले जात आहे. हे नियम पाळावेच लागणार आहेत अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आदेश गृहमंत्रालयाकडून देण्यात आले आहेत. कोरोना अजूनही पूर्णपणे संपलेला नसल्याने मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग या गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे. कोरोनाचे प्रमाण कमी झाल्याने अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. मात्र, या होळी आणि धुळवड सणाच्या निमित्ताने गृहखात्याने नवी नियमावली जारी केली आहे.
होळी, धुळवडीसाठी राज्य सरकारची नवी नियमावली
- राज्यात सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा असल्याने लाऊड स्पीकर जोरात लावू नये.
- सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी कायदा सुव्यवस्थेचे पालन करणे बंधनकारक असेल. रात्री १० च्या आत होळी करण्यात यावी.
- होळीच्या सणानिमित्त वृक्षतोड करू नये. केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- होळी सणावेळी सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोणताही डीजे लावण्यास परवानगी नाही. जर कोणी डी.जेचा वापर करताना आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- सर्वसामान्य जनतेस त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. होळी साजरी करताना मद्यपान करून बिभत्स व उद्धट वर्तन होणार नाही, याची काळजी घ्यावी.
- होळी सणानिमित्त जमा होणाऱ्या महिलांची व मुलींच कोणीही छेड काढणार नाही.याबाबत मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दक्ष राहावे. सर्वस्वी जबाबदारी त्यांची असेल.
- महिलांनी परिधान केलेले दागिने आणि मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी. होळी सणानिमित्त कोठेही आगी लागतील असे कृत्य करू नये.
- होळीच्या कार्यक्रमात कोणत्याही जाती धर्माच्या भावना दुखावल्या जातील, अशा घोषणा देण्यात देऊ नये. तसेच आक्षेपार्ह फलक/बॅनर लावण्यात येऊ नयेत.
- होळी किंवा धुलिवंदनाच्या निमित्ताने कोणीही जबरदस्ती रंग, फुगे व पाण्याच्या पिशव्या कोणाच्याही अंगावर फेकू नये.