शेतकऱ्यांच्या नोटिसांची मोदींच्या गावात होळी
By admin | Published: April 16, 2017 02:55 AM2017-04-16T02:55:43+5:302017-04-16T02:55:43+5:30
शासनाच्या धोरणामुळे जगाचा पोशिंदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे़ दुष्काळामुळे आर्थिक अडचणीत असताना शेतकऱ्यांना
तुळजापूर (जि. उस्मानाबाद) : शासनाच्या धोरणामुळे जगाचा पोशिंदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे़ दुष्काळामुळे आर्थिक अडचणीत असताना शेतकऱ्यांना वीजबिल, बँकेच्या नोटीसा दिल्या जात आहेत़ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडनगर गावातच या नोटीसांची होळी करणार आहे, असे आ़ बच्चू कडू यांनी सांगितले.
शेतकरी संघटना, प्रहार संघटनेच्या वतीने काढण्यात आलेली ‘सीएम टू पीएम’ आसूड यात्रा शुक्रवारी तुळजापूर शहरात आली़ या यात्रेचे तुळजापूरकरांनी जोरात स्वागत केले़ यानिमित्त आयोजित जनता दरबारात आ़ कडू बोलत होते़ यावेळी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथ पाटील, प्रहार संघटना, शेतकरी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
नरेंद्र आणि देवेंद्र सरकार जाहिरनाम्यातील आश्वासनांकडे दुर्लक्ष करून काम करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने वाईट दिवस आलेले आहेत. मोठ्या उत्साहाने आपण काँग्रेसला घालवले. आम्ही सत्तेवर आलो तर उत्पादन खर्चापेक्षा ५० टक्के नफा देवू, अशाप्रकारची मोठी आश्वासने त्यांनी दिली. परंतु यापैकी काही झाले नाही. उलट शेतकरी आत्महत्या वाढत आहेत, असे रघुनाथ पाटील यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)
शेतकऱ्यांनो, आरपारच्या लढाईत सहभागी व्हा!
सत्ता आली की व्यापारी आणि सत्ता गेली की सरकारला शेतकरी दिसतो. सातवा वेतन आयोग जाहीर करून १६ लाख कर्मचाऱ्यांना पावणेदोन लाख कोटी रुपये देण्याचे नियोजन होते. परंतु, कर्जबाजारी होऊन आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत देण्यास किंवा कर्जमाफी करण्यास सरकारकडे पैसे नाहीत. शेतकऱ्यांसाठी आम्ही आता ही आरपारची लढाई लढत असून, यात सहभागी व्हावे, असे आवाहन बच्चू कडू यांनी विटा (सांगली) येथे केले.