सुट्टीनिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांचे होणार हाल, मुंबई-पुणे घाटभागातील कामामुळे एक्स्प्रेसचे वेळापत्रक कोलमडले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 06:55 AM2019-11-27T06:55:57+5:302019-11-27T06:56:44+5:30
मुंबई ते पुणे घाटभागात मध्य रेल्वेच्या वतीने युद्धपातळीवर काम सुरू आहे. परिणामी, अनेक एक्स्प्रेसच्या मार्गात बदल केला आहे.
मुंबई : मुंबई ते पुणे घाटभागात मध्य रेल्वेच्या वतीने युद्धपातळीवर काम सुरू आहे. परिणामी, अनेक एक्स्प्रेसच्या मार्गात बदल केला आहे. तर, अनेक एक्स्प्रेस रद्द केल्या आहेत. ३१ डिसेंबरपर्यंत येथील कोलमडलेले एक्स्प्रेसचे वेळापत्रक रुळावर येण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे नाताळ, नववर्षासाठी बाहेरगावी जाणाऱ्यांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.
जून ते नोव्हेंबरपर्यंत पडलेल्या मुसळधार पावसामुळे घाटभागातील पट्ट्यात रेल्वेमार्गाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यात मंकी हिल ते नागनाथ या दोन स्टेशनमधील दक्षिण घाट परिसरातील मुंबई दिशेकडील रेल्वेमार्ग वाहून गेला. त्यामुळे ३ आॅक्टोबरपासून मध्य रेल्वेकडून मंकी हिल आणि कर्जत स्थानकादरम्यान मुंबई दिशेकडे येणाºया तिसºया मार्गावर दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे ३१ डिसेंबरपर्यंत येथील काम जलद करण्यासाठी एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
दोन टनेलमध्ये एकीकडे टेकडी असलेला डोंगर भाग तर दुसरीकडे दरी या दोन्हीच्या मध्यभागी असलेला रेल्वेमार्ग उभा करणे आव्हानात्मक असून, रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच या मार्गावर इतका मोठा ब्लॉक घेऊन कामे केली जात आहेत. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून या भागात गर्डर उभारण्यात येत आहे.
दुरुस्तीसाठी १५० कामगारांची फौज
येथे २४ तास युद्धपातळीवर काम सुरू आहे. सुमारे १५० कामगारांच्या साहाय्याने घाट भागातील काम केले जात आहे. क्रेनच्या साहाय्याने गर्डर टाकण्याचे काम सुरू आहे. १५० मीटर लांबीचा मार्ग बनविला जात आहे.
८० टन स्टील सामग्री, ३५० ट्रक दगड, सुमारे १०० ट्रक सिमेंटच्या साहाय्याने गर्डर, सुरक्षा भिंत बनवली जात आहे. या सर्व कामासाठी सुमारे १० कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून दिली गेली.
या गाड्यांवर होणार परिणाम
३१ डिसेंबरपर्यंत विजापूर-मुंबई-विजापूर पॅसेंजर, पनवेल-पुणे-पनवेल पॅसेंजर या दोन एक्स्प्रेस रद्द केल्या आहेत. २९ डिसेंबरपर्यंत पंढरपूर-मुंबई-पंढरपूर पॅसेंजरही रद्द केली आहे. १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत भुसावळ-पुणे-भुसावळ एक्स्प्रेस दौंड-मनमाड मार्गाने वळविण्यात येणार आहेत. तर, मुंबई-कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस, हुबळी-एलटीटी-हुबळी एक्स्प्रेस, मुंबई-हैदराबाद-मुंबई हुसेनसागर एक्स्प्रेस, एलटीटी-विशाखापट्टणम-एलटीटी एक्स्प्रेस, नांदेड-पनवेल-नांदेड एक्स्प्रेस आणि पनवेल-नांदेड-पनवेल एक्स्प्रेस पुणे स्थानकापर्यंत धावतील.