सदाभाऊ खोत यांना रुग्णालयातून सुटी
By admin | Published: April 17, 2017 01:18 AM2017-04-17T01:18:29+5:302017-04-17T01:18:29+5:30
बुलडाणा : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची प्रकृती शनिवारी अचानक बिघडल्यामुळे त्यांना चिखली येथील रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांच्यावर रात्री उपचार केल्यानंतर सकाळी ७ वाजता सुटी देण्यात आली.
नियोजित दौऱ्यानुसार सावळा, हातणी येथे घेतल्या सभा
बुलडाणा : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची प्रकृती शनिवारी रात्री १० वाजताच्या दरम्यान अचानक बिघडल्यामुळे त्यांना चिखली येथील रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांच्यावर रात्री उपचार केल्यानंतर सकाळी ७ वाजता सुटी देण्यात आली.
कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत शनिवार व रविवारी वऱ्हाडच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यानुसार शनिवारी बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथे सभा घेतली. ही सभा पार पडल्यानंतर ते चिखली येथे मुक्कामासाठी येत असताना अचानक त्यांची प्रकृती खालावली. त्यांना उलटीसोबत श्वास घेताना त्रास होऊ लागला.
यावेळी त्यांच्यासोबत वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर होते. त्यामुळे त्यांना चिखली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. योगीराज हॉस्पिटलचे डॉ. सुहास खेडेकर यांनी त्यांची तपासणी करून औषधोपचार केला.
दरम्यान, त्यांना सकाळी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यानंतर त्यांनी नियोजित दौऱ्यानुसार सावळा, हातणी आदी ठिकाणी सभा तसेच बैठका घेतल्या.