होलोग्रामचे कंत्राट रद्द नव्हे, दुरुस्तीसाठी थांबवले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2016 05:23 AM2016-08-22T05:23:38+5:302016-08-22T05:23:38+5:30
होलोग्राम वापराचे कंत्राट मुख्यमंत्र्यांनी रद्द केले नसून ते तांत्रिक दुरुस्ती आणि त्याची जागतिक निविदा प्रसिद्ध करण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली.
जळगाव : बनावट मद्यविक्री रोखण्यास राज्य शासनातर्फे बाटलीवर होलोग्राम वापराचे कंत्राट मुख्यमंत्र्यांनी रद्द केले नसून ते तांत्रिक दुरुस्ती आणि त्याची जागतिक निविदा प्रसिद्ध करण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी रविवारी येथे दिली.
ते म्हणाले, बनावट मद्याची विक्री रोखण्यासाठी उत्पादन शुल्क मंत्री असताना बाटलीवर होलोग्राम लावण्याचा निर्णय घेतला होता. परवानाधारक मद्यप्राशन करणाऱ्या इसमाला होलोग्रामद्वारे बनावट मद्य ओळखण्यासाठी आवश्यक ते तंत्रज्ञान मोफत देणार होते. यातून मद्याचा काळाबाजार थांबून शासनाच्या तिजोरीत वार्षिक पाच हजार कोटींच्या उत्पन्नाची भर पडणार आहे. होलोग्राम तयार करणारा ठेकेदार व मद्य उत्पादन करणारी कंपनी यांच्यात हा व्यवहार होणार आहे. त्याबदल्यात येणारा खर्च हा संबंधित ठेकेदाराने मद्य उत्पादन करणाऱ्या कंपनी मालकाकडून घ्यायचा आहे. मात्र हे तंत्रज्ञान वापराचे जे निकष आहे त्याचे कंत्राट शासनातर्फे काढण्यात आले आहे. या प्रक्रियेत शासनाला एक रुपया द्यायचा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बनावट मद्याचा काळाबाजार रोखण्यासाठी होलोग्राम तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत मुख्यमंत्र्यांसह आपण सुरुवातीपासून आग्रही आहोत. त्यासंदर्भात दोन वेळा मंत्रालयात सादरीकरण करण्यात येऊन मंत्रिमंडळाची मान्यता घेण्यात आली होती. हे कंत्राट देशस्तरावर आहे. आता जागतिक स्तरावर निविदा प्रसिद्ध करण्याबाबत, कंत्राटातील काही त्रुटी दूर करण्याबाबत विचार सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मीडिया ट्रायल संपलेली नाही
बनावट मद्य रोखण्यासाठी होलोग्राम तंत्रज्ञानाच्या संदर्भात ही वस्तुस्थिती असताना हजार कोटींचे कंत्राट रद्द केल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. त्यामुळे आपल्याबाबत सुरू असलेली मीडिया ट्रायल अजून संपलेली नाही. मद्याच्या बाटलीवर होलोग्राम बसल्यामुळे बनावट दारूचा काळाबाजार बंद होऊन अनेकांना फटका बसणार आहे. मात्र मीडियातून दिशाभूल करण्याचे प्रकार सुरू असल्याचे खडसे म्हणाले. (प्रतिनिधी)