संयम अन् शांततेचा संदेश देणारा पवित्र रमजान
By admin | Published: June 8, 2017 03:25 AM2017-06-08T03:25:13+5:302017-06-08T03:25:13+5:30
मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू होऊन १३ दिवस पुर्ण झालेले आहेत.
हुसेन मेमन।
लोकमत न्यूज नेटवर्क
जव्हार : मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू होऊन १३ दिवस पुर्ण झालेले आहेत. रमजान महिना हा उपवासाचा (रोजा) महिना या महिन्यात प्रत्येक मुस्लिम व्यक्तीने रोजा ठेवावा, असे सांगितलेले आहे. कुराणाचे पठण या महिन्यात अत्यंत पवित्र मानले जाते.
संयमाचा महिना अशीही रमजानची ओळख आहे. यामध्ये मुस्लिम एकमेकांकडे इफ्तारचे आयोजन करत आहेत. त्याच बरोबर गरजूंना मदत केली जाते. ज्याच्यावर अल्लाची कृपा आहे त्यांनी सर्व साध्य केले असे मानले जाते.
तुम्हाला स्वत:ला एक दिवस अल्लासमोर हजर व्हायचे आहे किंवा अल्ला सतत आपल्याजवळ असल्याचा विश्वास बाळगावा. त्याशिवाय कोणत्याही सत्कार्याला पूर्णत्व येत नाही. अल्लावरील श्रद्धा व अल्लाची कृपा या दोन गोष्टींच्या जीवनात महत्वाच्या असतात. अल्लाची कृपा माणसाला सत्कार्याची प्रेरणा देते व अपराध्यांच्या भयानक परिमाणाच भय त्याला अल्लाचा कोप होण्यापासून दूर ठेवते. आपण अल्लाच्या कोपापासून आपला बचाव करतो आणि वाईटापासून दूर राहून चांगुलपणा आत्मसात करतो, यालाच अल्लाची भक्ती म्हणतात. अल्लाहने कुरआनात म्हटले आहे की, पालनकर्त्या समोर उभे राहण्याचे भय बाळगले आणि वाईट इच्छेपासून मनाला दूर ठेवले की, स्वर्ग त्याच ठिकाणी निर्माण होतो.
रमजानच्या पवित्र महिन्यात जो रोजा ठेवला जातो. त्यामुळे माणसातील प्रबळ अशा स्वाभाविक इच्छांवर नियंत्रण मिळवता येते. पहाटेच्या सहेरी नंतर ते रोजा सोडण्याच्या काळात मनुष्य तहानलेला, भुकेला असतो. अशा व्यक्तीमध्ये संयम आणि सहन शक्ती याच बरोबर अल्लाबाबतची श्रद्धाही निर्माण होत असते. अशा प्रकारे रोजा रोजा हा मनुष्याला स्वत:ला नियंत्रित करून उत्कट स्वाभाविक इच्छांवर नियंत्रण ठेवतो. हिच शक्ती अल्लाबाबतची भक्ती आणि श्रद्धा निर्माण करते. म्हणूनच नमाज व रमजानच्या उपवासामध्ये एका विशिष्ट वेळी खाणेपिणे करायला लावणे व एका विशिष्ट वेळी ते सोडायला लावण्याची शिस्त निर्माण केली गेली आहे, असा हा रमजान महिना व या महिन्यातील रोजे याचे महत्व आहे.