पवित्र रमझानचे रोजे करुन बैजल कुटूंबीय निघाले पंढरपूर सायकल वारीला
By admin | Published: July 8, 2016 01:18 PM2016-07-08T13:18:01+5:302016-07-08T13:18:06+5:30
पवित्र रमझानमधील रोजांचे उपास पूर्ण करुन ईद सण अत्यंत आनंदाने साजरी केल्यावर बईचे अन्न व औषध प्रशासनाचे सह आयूक्त हरिष बैजल व कुटुंबिय सायकलवरून पंढरपूरला निघाले आहेत.
Next
जयंत धुळप
अलिबाग, दि. ८ - हिंदू- मुस्लिम एकात्मतेने भारावून गेलेले राज्यातील बहूदा एकमेव कुटुंब म्हणजे मुंबईचे अन्न व औषध प्रशासनाचे सह आयूक्त हरिष बैजल यांचे कुटुंबिय... गुरुवारी हरिष बैजल यांच्या पत्नी छाया बैजल यांनी पवित्र रमझान मधील रोजांचे उपास पूर्ण करुन ईद सण अत्यंत आनंदाने साजरी केल्यावर आज सकाळी सहा वाजता हरिष बैजल, त्यांच्या पत्नी छाया आणि दोन चिरंजीव अभिषेक व करण यांनी नाशिक मधील आपल्या अन्य तब्बल 350 सायकल वारकऱ्यांसह पंढरपूर वारीला प्रारंभ केला आहे.
हिंदू-मुस्लिम दोन्ही धर्मात उपासाचे महत्व एकच
मुस्लिम धर्मातील ‘रोजे’ आणि हिंदू धर्मातील श्रावण महिन्यातील ‘उपास’ हे दोन्ही मानवी शरिरस्वास्थ सुयोग्य राहाण्याकरीता धर्माच्या आधारावर सांगीतलेला शास्त्रीय उपायच असल्याचे हरिष बैजल यांचे म्हणणे आहे. आपल्या हिंदूंच्या आषाढ-श्रावण महिन्यात तर त्याच काळात येणारा:या मुस्लिम पंचागातील रमझान महिन्यात उन्हाळा संपून पावसाळा सुरु होतो, वातावरणात मोठा बदल होतो आणि हा वातावरणातील बदलाचा मानवी शरिरावर विपरित परिणाम होवून आजारी पडण्याची शक्यता असते. अशी परिस्थिती येवू नये या करिता या काळात ‘लंघन’ म्हणजेच उपास हा उपाय दोन्ही धर्मामध्ये एकाच उद्देशाने सुचविला आहे, हे लक्षात घेवून आम्ही हे रोजे पाळतो. गतवर्षी छाया बैजल यांनी पूर्ण रमझान महिना तर यंदा रमझान मधील अखेरचे 15 दिवस असे रोजे केल्याचे बैजल यांनी सांगीतले.
पंढरपूरच्या वारीचा संबंध देखील मानवी स्वास्थाशीच
पंढरपूरच्या वारीचा संबंध देखील मानवी स्वास्थाशीच आहे. पांडूरंगाच्या दर्शनाच्या श्रद्धेपोटी वारकरी शेकडो किमी अंतर उन-वारा-पाऊस याची तमा न बाळगता, पांडूरंग नामाचा मुखाने गजर करित चालत येवून आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरात पोहोचतात आणि त्यांच्या जीवनाचे सार्थक होते. चालण्या सारखा प्रकृती स्वास्थाकरीता दूसरा कोणताही प्रभावी व्यायाम नाही अशी भूमिका बैजल यांची आहे.
व्यायामातून नाशिककरांशी जुळले आगळे नाते
व्यायामाची प्रचंड आवड असणारे हे बैजल कूटूंब गेल्या चार वर्षापासून नाशिक मध्ये होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधिक्षक आणि त्यानंतर पोलिस प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख अशा नोकरीच्या निमीत्ताने त्यांच्या कुंटूंबाची पक्की नाळ नाशिककराबरोबर जूळली. दररोज सकाळी धावणो, सायकल चालवणो, योगा आदि व्यायामाच्या निमीत्ताने बैजल यांच्या प्रेमात नाशिककर आणि त्यातच तरुणाई अधिक प्रेमात पडली.
सन 2012 मध्ये झाला नाशिक-पंढरपूर सायकल वारीस प्रारंभ
नाशिक-त्रंबकेश्वर आणि जवळपासचे रविवारचे एक दिवसांचे सायकल ट्रेक करता करता, सायकलींग प्रेमी 300 ते 400 तरुणांची फौजच बैजल यांनी आपल्या प्रत्यक्ष सायकलींगच्या कृतीतून उभी केली. त्यांतूनच सन 2012 मध्ये प्रथम त्यांनी नाशिक ते पंढरपूर सायकल वारीचे नियोजन केले आणि पहिली पंढरपूर सायकल वारी झाली. उत्साह वाढला आणि दरवर्षी ही पंढरपूर वारी वाढत्या सायकल वारकऱ्यांच्या सहभागातून सूरु झाली.
यंदाच्या पाचव्या नाशिक-पंढरपूर सायकल वारीस झाला प्रारंभ
यंदा बैजल यांची मुंबईत बदली होवून, अन्न व औषध प्रशासनाचे सह आयूक्त म्हणून नियूक्ती झाली आणि नाशिकच्या तरुण सायकल वारक:यांमध्ये एक नाराजीची लकेर आली. पण हरिष बैजल यांनी या तरुणाईला नाराज केले नाही. गुरुवारी मुंबईत रमझानचे रोजे पूर्ण करुन रात्रीच नाशिकला दाखल होवून, आज सकाली सहा वाजता तब्बल 350 सायकल वारक:यांसह बैजल कुटूंबीय पंढरपूरला सायकलवर रवाना झाले आणि नाशिकचीही तरुणाई सुखावून गेली.
रविवारी दुपारी पांडूरंगा चरणी पोहोचणार सायकल वारी
आज (शुक्रवार) या सायकल वारीचा पहिला मुक्काम 160 किमीचे अंतर पार करुन अहमदनगर येथे होईल. दुसरा मुक्काम त्यापूढील 180 किमीचे अंतर पार करुन शनिवारी टेंभूर्णी येथे तर रविवारी दुपार र्पयत सायकल वारी पंढरपूराच पांडूरंगाच्या चरणी पोहोचून दर्शन घेईल अशी माहिती बैजल यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.