वणव्यामुळे घर खाक
By Admin | Published: March 20, 2016 02:13 AM2016-03-20T02:13:59+5:302016-03-20T02:13:59+5:30
मोहाफुल वेचण्याकरीता ग्रामस्थांकडून जंगलात लावण्यात आलेल्या आगीचा वणवा गावापर्यंत पसरल्याने दोन शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
देवरी : मोहाफुल वेचण्याकरीता ग्रामस्थांकडून जंगलात लावण्यात आलेल्या आगीचा वणवा गावापर्यंत पसरल्याने दोन शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. यात एका शेतकऱ्याचे घर जळून पूर्णपणे राख झाल्याची घटना शनिवारला दु.१ वाजता मल्हारबोडी गावात घडली.
देवरीपासून ५ किमी अंतरावर असलेले मल्हारबोडी हे गाव १५ ते २० घरांचे आहे. गावातील महिला पुरूष मग्रारोहयोच्या कामावर गेले होते. काही लोकांनी मोहफुल वेचण्याकरीता जंगलाला आग लावल्यामुळे ती आग गावापर्यंत पोहोचली. या आगीमुळे गावातील वाड्या, तणसाचे ढिगारे, शेतातील सिंचनाचे पाईप व एका शेतकऱ्यांचे मकान पूर्णत: जळून राख झाले.
घर जळालेल्या शेतकऱ्यांचे नाव मोतीनाथ काशीनाथ ठाकरे (६६) असे आहे. ते एकटेच आपल्या घरात राहात होते. याप्रसंगी ते घरात झोपलेले होते. गावात कोणीच ग्रामस्थ नसल्याने आग विझविता न आल्याने मोतीनाथ ठाकरे यांचे घर राख झाले. या शेतकऱ्याच्या घराला लागून असलेले लक्ष्मण दागो प्रधान (६०) यांच्या घराबाहेर ठेवलेले सिंचन पाईप पूर्णपणे जळाले. तसेच तणसाचे ढिगारे पूर्णपणे जळाले.
घटनेची बातमी कळताच देवरीचे तहसीलदार संजय नागटिळक यांनी देवरी व चिचेवाड्यावरुन पाण्याचा टॅकरची व्यवस्था करून आग आटोक्यात आणली. दोन्ही शेतकऱ्यांना सांत्वना देत सरकारी मदत देण्याचे आश्वासन दिले. या वणव्यामुळे मल्हारबोडी गावातील लोकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई त्वरीत देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (प्रतिनिधी)