व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला घरघर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 04:01 AM2019-11-22T04:01:33+5:302019-11-22T04:01:38+5:30
मंदीमुळे रोजगार मिळेना; राज्यातील विद्यार्थ्यांची पारंपरिक अभ्यासक्रमास पसंती
- राहुल शिंदे
पुणे : राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाली असून, या शैक्षणिक वर्षात अभियांत्रिकीच्या ४८ टक्के, एमसीएच्या ४४ टक्के, हॉटेल मॅनेजमेंटच्या ४८ टक्के, आर्किटेक्चरच्या ४६ टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत. उद्योग क्षेत्रातील मंदी, क्षमता नसताना विद्यार्थ्यांनी घेतलेला प्रवेश आणि व्यावसायिक पदवी घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना मिळणाºया तुटपुंज्या वेतनामुळे ही परिस्थिती ओढवली आहे.
अभियांत्रिकी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी लाखो रुपये खर्च करणाºया विद्यार्थ्यांना १५ ते २५ हजार रुपयांची नोकरी मिळत आहे. क्षमता नसताना तिथे प्रवेश घेणारे विद्यार्थी शिक्षण अर्ध्यावर सोडून घरी बसतात. त्यामुळे इतर विद्यार्थी व पालकांचा अभियांत्रिकीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. गेल्या काही वर्षांत आर्किटेक्चर व फार्मसी अभ्यासक्रमाच्या जागा वाढल्यामुळे त्याही रिक्त राहत आहेत. याउलट बी.एस्सी, बी.कॉम, बीबीए, बीसीए अशा अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने प्रवेश घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे पाठ फिरवून विद्यार्थी पारंपरिक अभ्यासक्रमांकडे वळत असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे.
अभियांत्रिकी, औषधनिर्माण, व्यवस्थापनशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट, आर्किटेक्चर, मास्टर इन कॉम्प्युटर अॅप्लिकेशन आदी अभ्यासक्रमांच्या महाराष्ट्रात एकूण तीन लाख १८ हजार ६६० जागा आहेत. त्यातील केवळ एक लाख ८८ हजार ८१८ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. उर्वरित १ लाख २९ हजार ८४२ जागा रिक्त राहिल्या आहेत. त्यामुळे यंदा राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या एकूण ४१ टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत. महाराष्ट्रासह देशभरातील अनेक
उद्योगांनी मंदीमुळे कामगार कपात केली आहे. त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न गंभीर होत आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमास त्याचा फटका बसत असल्याचे अभ्यासकांकडून सांगितले जात आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य व तंत्रज्ञान विभागाचे डीन डॉ. पराग काळकर म्हणाले की, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल असतो. मात्र, टेलिकॉम कंपन्यांसह अनेक कंपन्या डबघाईला आल्या आहेत. त्यामुळे अभियांत्रिकीपेक्षा विद्यार्थी बीबीए, बीबीए, बीसीएला प्रवेश घेत असल्याचे दिसून येत आहे. यंदा व्यवस्थापनशास्त्र अभ्यासक्रमास चांगले प्रवेश झाले असून केवळ १३ टक्के जागा शिल्लक राहिल्या आहेत. उद्योगाला आवश्यक कुशल मनुष्यबळ निर्माण होईल, अशा संस्थांना व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश करण्यास मंजुरी दिली पाहिजे. मात्र, याबाबत कोणतेही नियोजन नाही. व्यावसायिक अभ्यासक्रम विशिष्ट उद्देशाने सुरू झाले आहेत. त्यात कालानुरूप बदल होणे गरजेचे आहे, असे मत सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.वासुदेव गाडे,माजी कुलगुरू यांनी व्यक्त केले.
व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारी
अभ्यासक्रमाचे नाव संस्थांची संख्या प्रवेशक्षमता झालेले प्रवेश रिक्त राहिलेल्या जागा
अभियांत्रिकी ३४० १,२७,५३७ ६५,९२३ ६१,६१४ (४८%)
फार्मसी २९२ २२,५०० १८,५५३ ३,९४७ (१८%)
एमसीए ९१ ६,३८८ ३,५५८ २,८३० (४४%)
हॉटेल मॅनेजमेंट ११ ७८६ ४०६ ३८० (४८%)
आर्किटेक्चर ८७ ५,५३७ २९८९ २,५४८ (४६%)
एमबीए ३१७ ३३,९१५ २९,६५६ ४,२५९ (१३%)
इंजिनिअरिंग डिप्लोमा ४७३ १,५९,८०४ ७०,४०५ ८९,३९९ (५५.९४%)
फार्मसी डिप्लोमा २३७ १४,९८३ १०,२४४ ४,७३९ (३१.६३%)
ही स्थिती बदलेल : काही व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली असल्याचे दिसून येत असले; तरी ही स्थिती कायम राहणार नाही. मात्र, विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश का घेत नाहीत, याचे सर्व घटकांनी चिंतन करून त्यावर उयाय शोधले पाहिजेत.
- डॉ. मनोहर चासकर, डीन, विज्ञान व तंत्रज्ञान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ