तस्करीतील जप्त प्राण्यांना हक्काचे घर; वनविभागाचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 07:54 AM2021-10-18T07:54:17+5:302021-10-18T07:54:45+5:30

राज्यभरात ‘रिटर्न टू वाइल्ड’ उपक्रम

Home to the confiscated animals in the smuggling | तस्करीतील जप्त प्राण्यांना हक्काचे घर; वनविभागाचा पुढाकार

तस्करीतील जप्त प्राण्यांना हक्काचे घर; वनविभागाचा पुढाकार

Next

- श्रीकिशन काळे

पुणे : प्राण्यांची तस्करी होत असल्यास वनविभागाकडून ते प्राणी जप्त केले जातात. काही ठिकाणी रस्त्यात किंवा इतर ठिकाणी जखमी अवस्थेत प्राणी आढळतात. त्यांना पुन्हा त्यांच्या हक्काच्या घरी (अधिवासात) पाठविण्यासाठी वनविभागाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी राज्यभरातील अशा प्राण्यांना ‘रिटर्न टू वाइल्ड’ या उपक्रमाद्वारे पुण्यातील बावधन येथील रेस्क्यू सेंटरमध्ये आणण्यात येणार आहे.

राज्यात विविध ठिकाणी प्राण्यांना रेस्क्यू केल्यानंतर त्यांच्यावर उपचार करून अधिवासात सोडले जाते. अनेकदा शासकीय यंत्रणेच्या कात्रीत हे प्राणी अडकतात आणि त्यांचे अधिवासात जाणे रखडते. त्यामुळे आता मुख्य प्रधान वनसंरक्षक (वाइल्ड) सुनील लिमये यांच्या पुढाकाराने अशा प्राण्यांना अधिवासात सोडण्यासाठी खास समिती बनवली आहे. त्यामध्ये रेस्क्यू टीमच्या नेहा पंचमिया, वनसंरक्षक (वन्यजीव, पुणे) बी. रमेश आणि युवराज पाटील यांचा समावेश आहे. या समितीला कॅप्टन वाइल्ड कमिटी असे नाव दिले आहे.

नेहा पंचमिया म्हणाल्या, ‘सध्या सर्व राज्यांतील वनविभागांना त्यांच्याकडे अडकलेल्या प्राण्यांची माहिती व संख्या देण्यास सांगितले आहे. त्यासाठी ऑनलाइन सिस्टीम टूल विकसित केले असून, त्यावर सर्वजण माहिती अद्यावत करत आहेत.

राज्यातील सर्व प्राण्यांना पुण्यातील बावधन येथील रेस्क्यू सेंटरमध्ये आणण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर उपचार करून अधिवासामध्ये सोडण्यात येईल. सरपटणारे प्राणी, कासव, दुर्मीळ प्रजाती आदी प्राण्यांसाठी हा उपक्रम सुरू केला आहे.
- नेहा पंचमिया, संस्थापक अध्यक्ष, रेस्क्यू, पुणे

कासव विमानाने हक्काच्या घरी
काही महिन्यांपूर्वी पुणे वनविभागाने दुर्मीळ जातीचे कासव व पाली पकडल्या होत्या. या कासवांचा अधिवास हा आसाम येथील होता. त्या कासवांना आपल्याकडील हवामान मानवत नाही. म्हणून त्यांना खास विमानाने आसामला पाठविण्यात आले. पुणे विभागाने राबविलेला हा उपक्रम राज्यातील पहिलाच ठरला 

Web Title: Home to the confiscated animals in the smuggling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.