गृह विभागाने सुजाता पाटील यांच्याबाबत माहिती मागविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 06:33 AM2018-06-12T06:33:40+5:302018-06-12T06:33:40+5:30
बदलीबाबत अन्याय होत असल्याने कुटुंबीयातील सदस्यांसमवेत सामूहिक आत्महत्येचा इशारा देणाऱ्या हिंगोलीतील उपअधीक्षक सुजाता पाटील यांच्याबाबतची सविस्तर माहिती गृह विभागाने सोमवारी मागविली आहे.
- जमीर काझी
मुंबई - बदलीबाबत अन्याय होत असल्याने कुटुंबीयातील सदस्यांसमवेत सामूहिक आत्महत्येचा इशारा देणाऱ्या हिंगोलीतील उपअधीक्षक सुजाता पाटील यांच्याबाबतची सविस्तर माहिती गृह विभागाने सोमवारी मागविली आहे. अपर मुख्य सचिव (गृह) सुधीर श्रीवास्तव यांच्या कार्यालयातून त्यांनी आतापर्यंत शासनाकडे केलेल्या पत्रव्यवहाराची माहिती घेतली.
उपअधीक्षक सुजाता पाटील यांनी कुटुंबीयांसमवेत सामूहिक आत्महत्या करण्याबाबतच्या ‘व्हॉटस्अप पोस्ट’बाबतचे वृत्त ‘लोकमत’ने सोमवारी दिले होते. त्याची गांभीर्याने दखल घेत शासनाने ही कार्यवाही केली. दरम्यान, पाटील यांच्या पोस्टमुळे पोलीस वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून बदल्यांतील वशिलेबाजी व राजकारण संपविण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.
सुजाता पाटील या दोन वर्षांपासून कौटुंबिक कारणास्तव मुंबईत बदली होण्यासाठी वारंवार मुख्यमंत्री व पोलीस मुख्यालयातील अधिकाºयांना पत्रव्यवहार व प्रत्यक्ष भेटून(ओआर) विनंती करीत आहेत. मात्र प्रत्येक वेळी त्यांना डावलण्यात आले. शुक्रवारी गृह विभागाकडून उपअधीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले. या वेळीही त्यांचे नाव यादीत नसल्याने त्यांनी उद्विग्न होऊन महानिरीक्षक व्हटकर यांना व्हॉटस्अपवर मेसेज करून व्यथा मांडत आत्महत्येचा इशारा दिला आहे.