‘सर्वांना घरे’ हाच केंद्रबिंदू राहणार
By admin | Published: April 17, 2016 01:37 AM2016-04-17T01:37:37+5:302016-04-17T01:37:37+5:30
शहरे ही ‘आहे रे’ वर्गाबरोबर ‘नाही रे’ वर्गासाठीही राहण्याजोगी व परवडणारी असली पाहिजेत. शहरांचा विकास करताना तो सर्वसमावेशक असायला हवा; या दृष्टीने परवडणारी घरे उभारून ‘सर्वांसाठी घरे
मुंबई : शहरे ही ‘आहे रे’ वर्गाबरोबर ‘नाही रे’ वर्गासाठीही राहण्याजोगी व परवडणारी असली पाहिजेत. शहरांचा विकास करताना तो सर्वसमावेशक असायला हवा; या दृष्टीने परवडणारी घरे उभारून ‘सर्वांसाठी घरे’ या संकल्पनेवर भर दिला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शनिवारी ‘ब्रिक्स फ्रेंडशिप सिटीज कॉन्क्लेव्ह’चा समारोप झाला. त्यावेळी ते बोलत होते. ब्रिक्सचे सदस्य असलेल्या ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले होते. राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, ब्राझीलच्या शिष्टमंडळाचे प्रमुख तोवर दा सिल्वा न्युन्स, रशियाच्या शिष्टमंडळाचे प्रमुख जॉर्जी पोल्टव्हचेन्को, दक्षिण आफ्रिकेतीेल शिष्टमंडळाचे प्रमुख सुभेश पिल्लई, केंद्र शासनाचे अतिरिक्त सचिव अलोक डिमरी, ‘मुंबई फर्स्ट’चे अध्यक्ष नरेंद्र नायर आदी उपस्थित होते. सेंट पीटर्सबर्ग शहरातील नदीची स्वच्छता, त्याचे व्यवस्थापन हे आदर्शवत आहे. मुंबईतील मिठी नदीची स्वच्छता आणि व्यवस्थापन करताना त्यांचा अनुभव आणि कल्पना उपयुक्त ठरतील. याकामी आम्ही त्यांची मदत घेऊ, असे मुख्यमंत्री म्हणाले. मुख्य सचिव क्षत्रिय म्हणाले की, एकाच वेळी मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती करण्यामध्ये चीनमधील शांघाय शहराने चांगली कामिगरी केली आहे. मुंबईत या मॉडेलचा अवलंब करण्याबाबत त्यांचे मार्गदर्शन घेण्यात येईल. या परिषदेतून सहभागी देशांच्या प्रतिनिधींमध्ये विचार व संकल्पनांचे आदान- प्रदान झाले, त्याचा लाभ पाचही देशांतील शहरांना होणार आहे. ब्राझील देशातील शिष्टमंडळाचे प्रमुख तोवर दा सिल्वा न्युन्स म्हणाले की, शहरांचा विकास करताना पर्यावरणप्रिय होणे गरजेचे आहे. यासाठी सर्व ब्रिक्स शहरांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. (विशेष प्रतिनिधी)