फाका घालत होम धगधगले...
By Admin | Published: February 24, 2015 09:49 PM2015-02-24T21:49:39+5:302015-02-25T00:14:40+5:30
रत्नागिरी जिल्हा : २ हजार ७८४ खासगी होळ्यांचीही धूम
सुभाष कदम - चिपळूण ‘साया रे साया डोंगरी साया, आमच्या भैरीबुवाला सोन्याचा पाया रे...’ अशा विविध फाका घालत सोमवारपासून रात्री पहिली होळी पेटवण्यात आली. यावेळी तरुणांच्या उत्साहाला उधाण आले होते.
‘होळी रे होळी शिमग्याची पोळी...’ अशा गगनभेदी फाका घालत कोकणात फाक पंचमीपासून होळीला सुरुवात होते. गणेशोत्सवाइतकाच कोकणी माणसाला शिमगोत्सव प्रिय आहे. यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यात १२ हजार ९१६ पेक्षा जास्त होळ्या पेटणार आहेत, तर ९९६ ग्रामदेवतांच्या पालख्या शिमगोत्सवात घरोघरी फिरणार आहेत. आजपासून या होलिकोत्सवाला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या, तिसऱ्या होळीपासून होळीच्या खेळाला अधिकच रंगत येते.
काही ठिकाणी आट्या-पाट्या, कबड्डीसारखे खेळ खेळले जातात. रात्री उशिरा होळी लावताना काही ठिकाणी पोपटी किंवा मोंगा पार्टी केली जाते. पूर्वी होळीसाठी गवत व लाकडे चोरुन आणण्यात धन्यता मानत. आता काळ बदलला. त्यामुळे काही ठिकाणी लाकडाऐवजी केवळ पालापाचोळा व गवत वापरुन होळी पेटविली जाते. ग्रामीण भागात आजही शेवरीच्या झाडाचा होळीसाठी वापर केला जातो. यावर्षी १० हजार १३२ सार्वजनिक होळ्या, तर २ हजार ७८४ खासगी होळ्या मिळून १२ हजार ९१६ होळ्या पेटणार आहेत. होळीसाठी जवळजवळ १३ हजार झाडांची कत्तल केली जाणार आहे.
पर्यावरणाचा ऱ्हास टाळावा व परंपराही राखली जावी, यासाठी प्रामुख्याने प्रयत्न केला जात आहेत. शेवरीचे झाड हे तसे जंगली, काटेरी व निरुपयोगी गणले जाते. त्यामुळे होळीसाठी त्याचाच वापर केला जातो. काही ठिकाणी आंब्याचा किंवा माडाचा वापर केला जातो. गावानुसार प्रथा बदलते आणि परंपरेनुसार ती जोपासली जाते. आजही ग्रामीण भागात होळीला पुरणपोळीचा नेवैद्य दाखविला जातो. धुलीवंदनाच्या पहाटे होम लावला जातो. या होमाला नवदाम्पत्य नारळ अर्पण करते. काही ठिकाणी होमाला शीत (कोंबडा) बांधला जातो. होळीचे हे दहा दिवस लहानांपासून ते आबालवृद्धांपर्यंत चैतन्याने भरलेले असतात. उत्साह ओतप्रोत वाहात असतो. गावची यात्रा झाली की, शिमगोत्सवाची सांगता होते. रंगपंचमी किंवा गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक गावात शिंपण्याचा कार्यक्रम होत असतो. या उत्सवात रुढी, परंपरा, मानपान जपला जातो. मात्र, हे सारे करताना अमाप उत्साह प्रत्येकाच्या अंगी असतो.
समज, समजूती कायम...
सावर्डेत होल्टा होम...
सावर्डे गावी होल्टा होम लावला जातो. हा होम प्रसिद्ध आहे. पौर्णिमेच्या दिवशी हा होम लावला जातो. यावेळी दोन्ही बाजूचे मानकरी एकमेकांवर जळके होल्टे (जळके लाकूड) फेकतात. परंतु, आतापर्यंत त्यात कोणी जखमी झाल्याचे ऐकिवात नाही. मांसाहार किंवा मद्यप्राशन केलेल्यांना मात्र शिक्षा मिळतेच, असे मानले जाते.
आजपासून होळीच्या सणाला झाली सुरुवात.
१३ हजारपेक्षा जास्त शेवरीच्या व इतर झाडांची होणार कत्तल.
पारंपरिक पद्धतीने सायंकाळी सर्वत्र मोठ्या उत्साहात होळी आणण्यात आली.
काही ठिकाणी नवदाम्पत्यांतर्फे करण्यात आली होळीची पूजा.
आट्या-पाट्यांचा खेळ, दिंडे, आमट्या वाजवण्यासाठी तरुणाई सज्ज.
जिल्ह्यात
पेटणाऱ्या होळ्या
12916
सार्वजनिक होळ्या
10132
खासगी होळ्या
2784
996
ग्रामदेवतांच्या घरी फिरणाऱ्या पालख्या
झाडांची कत्तल
13000
595
खेळे सज्ज
काही ठिकाणी आंब्याची, तर बहुतांश ठिकाणी माडाची होळी असते.