होमगार्ड घालणार सर्वच निवडणुकांवर बहिष्कार; गृहमंत्र्यांना निवेदन

By विजय.सैतवाल | Published: October 8, 2023 02:34 PM2023-10-08T14:34:58+5:302023-10-08T14:35:37+5:30

आझाद मैदानावरील आंदोलनानंतरही दखल नाही

Home Guard to boycott all elections; Angry on State government | होमगार्ड घालणार सर्वच निवडणुकांवर बहिष्कार; गृहमंत्र्यांना निवेदन

होमगार्ड घालणार सर्वच निवडणुकांवर बहिष्कार; गृहमंत्र्यांना निवेदन

googlenewsNext

जळगाव : होमगार्डच्या विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेले उपोषण आमदार मंगेश चव्हाण यांची मध्यस्थी व मंत्री गिरीश महाजन यांच्या आश्वासनानंतर सोडण्यात आले. मात्र त्याला आता सव्वा महिना उलटला तरी मागण्यांविषयी घेण्यात येणारी बैठक झाली नाही की मागण्यांचा विचार होत नसल्याने आगामी सर्वच निवडणुकांवेळी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा राज्यातील सर्व होमागार्डनी दिला आहे. या संदर्भात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे.

३६५ दिवस नियमित रोजगारासह इतर विविध मागण्या होमगार्डकडून केल्या जात आहे. त्यासाठी वेळोवेळी निवेदन देण्यासह आंदोलन करण्यात आले. यात ७६ वर्षांच्या इतिहासात होमगार्ड हा तूटपुंजा मानधनावर सेवा देत आहे, असे होमगार्डचे म्हणणे आहे. होमगार्ड स्वतःवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधात तसेच नियमित ३६५ दिवस रोजगार मिळावा, यासाठी ते लढा देत आहे. त्याच पार्श्वभूमीवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठीच मुंबई येथे आझाद मैदानावर महाराष्ट्र राज्य होमगार्ड महासंघाच्या नेतृत्वात २१ ते २९ ऑगस्ट दरम्यान होमगार्डनी आंदोलन केले होते.

त्या वेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पुढील दहा दिवसात गृहमंत्र्यांशी बोलून संयुक्त भेट घालून होमगार्डना ३६५ दिवस नियमित रोजगारसह इतर २० मागण्यांवर चर्चा करण्यासंदर्भात बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले होते. त्या वेळी त्यांनी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्याशी फोनवरदेखील बोलणे करून दिले होते व त्यांनीही बैठक घेण्याविषयी सांगितले होते. त्यामुळे होमगार्डनी उपोषण तात्पुरते स्थगित केले. मात्र, अद्यापही गृहमंत्र्यांसोबतची बैठक झालेली नाही.

होमगार्डसह कुटुंब मतदान करणार नाही
मागण्यांसंदभात १५ ऑक्टोबरपूर्वी बैठक घ्यावी, अशी मागणी होमगार्डनी केली आहे. बैठक न झाल्यास होमगार्ड बहिष्कार आंदोलन करणार आहे. त्यात जळगाव जिल्ह्यातील एक हजार ९०० होमगार्डसह राज्यातील ४५ हजार ७२४ होमगार्ड, त्यांचे कुटुंब व मित्र परिवार आगामी सर्वच निवडणुकांवेळी मतदानावर बहिष्कार टाकणार आहे, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

न्याय हक्कासाठी लढा
होमगार्डच्या विविध मागण्यांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्ष केले जात आहे. आतादेखील मागण्यांसंदर्भात लवकरात लवकर बैठक होऊन मागण्या मान्य न झाल्यास आगामी सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यात येणार आहे. - डॉ. प्रतापराव मोहिते पाटील, व्यवस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य होमगार्ड महासंघ.

Web Title: Home Guard to boycott all elections; Angry on State government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.