घरांसाठी विधान भवनावर धडक
By admin | Published: July 14, 2017 02:34 AM2017-07-14T02:34:56+5:302017-07-14T02:34:56+5:30
गिरणी कामगारांच्या घराच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत गिरणी कामगार संघटनांनी राज्य सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गिरणी कामगारांच्या घराच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत गिरणी कामगार संघटनांनी राज्य सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. लोकमान्य टिळक पुण्यतिथीचे निमित्त साधत १ आॅगस्ट रोजी गिरगाव चौपाटी ते विधान भवन असा धडक मोर्चा काढण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे.
राष्ट्रीय मिल मजदूर संघासोबत रयतराज कामगार संघटना, गिरणी कामगार संघर्ष समिती, महाराष्ट्र गिरणी कामगार युनियन, सेंच्युरी मिल कामगार एकता मंच अशा विविध संघटनांनी एकत्र येत गिरणी कामगार कृती संघटना स्थापन केली आहे. या कृती संघटनेच्या वतीने हा महामोर्चा काढला जाणार आहे. महामोर्चात माजी गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांच्यासह गोविंदराव मोहिते, दत्ता इस्वलकर, जयप्रकाश भिलारे, नंदू पारकर, निवृत्ती देसाई, अण्णा शिर्सेकर, बजरंग चव्हाण, सुनील बोरकर, शिवाजी काळे असे विविध संघटनांचे कामगार नेते सामील होणार आहेत.
गिरणी कामगारांना घरे देण्याचा कायदा आघाडी सरकारने केल्यानंतर पहिल्या टप्प्यातच ६ हजार ९३३ घरांचे वाटप केले. मात्र भाजपा सरकारने सत्तेवर आल्यानंतर दोनवेळा सोडत काढूनही केवळ ५ हजार ५१० घरांचे वाटप केले आहे. सध्या गिरणी कामगारांची ७ हजार ७०० घरे तयार आहेत. मात्र त्याचे वाटप अकारण लांबवले जात असल्याचा गंभीर आरोप महामोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या अहिर यांनी केला आहे. ते म्हणाले की, २ डिसेंबर २०१६ रोजी मुख्यमंत्र्यांनी उरलेल्या घरांची सोडत लवकरच काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते हवेतच विरले. आता म्हाडाने आॅनलाइन फॉर्म भरण्याचे जाहीर केले असून, सुमारे २० हजारांहून अधिक कामगारांनी फॉर्म भरले आहेत. मात्र आधी फॉर्म भरलेल्या १ लाख ४० हजार कामगारांच्या घरांचा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे. परिणामी, आधीचे कामगार आणि त्यात आता नव्याने भर पडणाऱ्या कामगारांना घरे देण्यासाठी कोणतीच योजना सरकार आखत नसल्याचे अहिर यांचे म्हणणे आहे.
>१६ जुलैपासून प्रचारसभा
राज्यातील कल्याण, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी येत्या १६ जुलैला कामगारांच्या प्रचारसभा घेणार असल्याचे कृती संघटनेने सांगितले. या सभांमधून १ आॅगस्टला गिरणी कामगारांचा विक्रमी महामोर्चा काढण्याची तयारी केली जाईल. कृती संघटनेतील सर्व संघटनांचे नेते प्रचार सभांमध्ये भाषणे करतील, अशी माहिती गोविंदराव मोहिते यांनी दिली.