गृहमंत्री देशमुखांच्या राजीनाम्याचा प्रस्ताव नाही, राष्ट्रवादी काँग्रेस - शिवसेनेतील उच्चस्तरीय सूत्रांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 04:46 AM2021-03-20T04:46:00+5:302021-03-20T06:52:59+5:30
देशमुख यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत शुक्रवारी बोलावून घेतल्यावर आता त्यांचा राजीनामा येऊ घातलाय, अशी उत्कंठा निर्माण झाली होती. पवार यांच्या येथील जनपथ रस्त्यावरील निवासस्थानी दोघांमध्ये सकाळी प्रदीर्घ म्हणता येईल, अशी चर्चा झाली.
हरीश गुप्ता _
नवी दिल्ली : महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासंदर्भात अफवा व चर्चा होत असताना, ‘या क्षणाला’ तसा काही प्रस्ताव समोर नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील उच्च पातळीवरील सूत्रांनी म्हटले. (Home Minister Deshmukh's resignation is not proposed, according to high level sources in NCP-Shiv Sena)
देशमुख यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत शुक्रवारी बोलावून घेतल्यावर आता त्यांचा राजीनामा येऊ घातलाय, अशी उत्कंठा निर्माण झाली होती. पवार यांच्या येथील जनपथ रस्त्यावरील निवासस्थानी दोघांमध्ये सकाळी प्रदीर्घ म्हणता येईल, अशी चर्चा झाली. चर्चेनंतर बाहेर वार्ताहरांशी बोलताना अनिल देशमुख म्हणाले की, “मी पवार साहेबांना त्या प्रकरणी मुंबईतील घडामोडींची माहिती दिली.” विशेष म्हणजे, देशमुख यांनी “राज्य सरकार एनआयएला पूर्ण सहकार्य करीत आहे,” अशी सलोख्याची भूमिका घेतली होती. मात्र, ही भूमिका शिवसेनेच्या स्पष्ट भूमिकेच्या विसंगत आहे. शिवसेनेने या प्रकरणात एनआयए तपास हा राज्याच्या विषयांत हस्तक्षेप असल्याचे म्हटले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील सूत्रांनी ‘लोकमत’ला शुक्रवारी सायंकाळी सांगितले की, अनिल देशमुख यांना राजीनामा द्यायला लावण्यात काहीही राजकीय लाभ होणार नाही. शिवसेनेचे वरिष्ठ नेते संजय राऊत यांच्याशी संपर्क साधल्यावर ते म्हणाले, “ पवार-देशमुख यांच्या भेटीचा वेगळा अर्थ लावण्याची गरज नाही. कारण तो त्यांचा अंतर्गत विषय आहे.”
आमचे लक्ष्य निवडणुका -भाजप
भाजपमधील सूत्रांनी म्हटले की, आमच्या पक्षाचा सगळा भर हा पश्चिम बंगालमधील निवडणुकीवर असून, केंद्रीय नेतृत्वाला येते काही आठवडे काहीही करण्याची घाई नाही. “एनआयए व्यावसायिकपणे तिचे काम करीत असून, हत्या आणि खंडणीच्या घृणास्पद गुन्ह्यातील खऱ्याखुऱ्या अपराध्यांना पकडेल,” असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नजीक समजल्या जाणाऱ्या भाजपच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले.