Raj Thackeray Dilip Walse Patil: राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेला परवानगी मिळणार का? दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्टच सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 02:13 PM2022-05-17T14:13:04+5:302022-05-17T14:15:11+5:30
Raj Thackeray Dilip Walse Patil: राज ठाकरे यांचा पुणे दौरा निश्चित झाला असून, जाहीर सभेचे आयोजन शहर मनसेकडून करण्यात येत आहे.
मुंबई: मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा पुणे दौरा निश्चित झाला आहे. राज ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन २१ मे रोजी डेक्कन जिमखाना येथील मुठा नदी पात्रातील जागेत पुणे शहर मनसेकडून करण्यात येत आहे. त्याकामी मनसेच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या आदेशानुसार पुणे शहरात सभेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती पुणे शहर सरचिटणीस अजय शिंदे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. मात्र, राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी देणार का, याबाबत राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांनी यासंदर्भात स्पष्टपणे मत व्यक्त केले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
राज ठाकरे यांच्या पुण्यात होत असलेल्या सभेला परवानगी मिळणेबाबत दिलीप वळसे-पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर, राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेला परवानगी नाकारायचे काहीच कारण नाही. परवानगी मागितली, तर पोलीस आयुक्त ती देतील. तसेच पोलीस आयुक्तांनी घालून दिलेल्या नियमांप्रमाणे त्यांनी सभा घ्यायला काही हरकत नाही, असे दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची चूक असेल गुन्हे दाखल होतील
केंद्रीय महिला आणि बाल कल्याणमंत्री स्मृती इराणी यांच्या बालगंधर्व रंगमंदिरातील कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या नेत्या वैशाली नागवडे यांना मारहाण करणाऱ्या भाजपाच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर बोलताना दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची चूक असेल त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील. तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांची चूक असेल तर त्यांच्यावरही गुन्हे दाखल होतील. भाजपाच्या पुरुष पदाधिकाऱ्यांनी महिलांना मारहाण करणे ही अतिशय आक्षेपार्ह बाब आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध जी कारवाई करायची असेल ती होईल, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
दरम्यान, महाविकास आघाडीत मतभेद आहे, असे समजण्याचे कारण नाही. गोंदियातील निवडणुकीबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेतले गेले. तो मुद्दा स्थानिक आहे. त्याचा राज्याशी संबंध जोडणे योग्य नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नेमका आपला शत्रू कोण हे ओळखले पाहिजे. तेही एका पक्षाचे प्रमुख आहेत, त्यांनी जबाबदारीने आणि समजदारीने भूमिका घेतली पाहिजे, असा सल्ला दिलीप वळसे-पाटील यांनी यावेळी दिला.