VIDEO: गृहमंत्री वळसे पाटील यांच्या भाषणावेळी सुरू झाली अजान; अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 07:31 AM2022-04-05T07:31:12+5:302022-04-05T07:35:52+5:30
मशिदींवरील भोंग्यावरून राजकीय वातावरण तापलं असताना वळसे पाटील यांचा व्हिडीओ समोर
पुणे: मशिदीवर भोंगे लावण्यात आले असतील तर तुम्ही त्यासमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा लावा, असा आदेश मनसे प्रमुख राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यातून पक्ष कार्यकर्त्यांना दिला. त्यानंतर मुंबईतील घाटकोपरमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यानं स्वत:च्या कार्यालयावर लाऊडस्पीकर लावत त्यावर हनुमान चालिसा सुरू केला. सध्या यावरून राजकीय वातावरण तापलं असताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अजान सुरू होताच त्यांचं भाषण थांबवलं. पुण्यात ते कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. त्याचवेळी अजान सुरू झाली. अजानचा आवाज ऐकू येताच वळसे पाटील यांनी बोलायचे थांबले.
पुण्यातल्या शिरुरमध्ये दिलीप वळसे पाटील जनसभेला संबोधित करत होते. त्याचवेळी अजानचा आवाज त्यांच्या कानी पडला. यानंतर पाटील यांनी भाषण थांबवलं. त्यांनी उपस्थितांनादेखील शांत राहण्यास सांगितलं. या घटनेची सध्या परिसरात चर्चा आहे. एएनआयनं या घटनेचा व्हिडीओ ट्विट केला आहे.
#WATCH Maharashtra Home Minister Dilip Walse Patil halts his speech midway for Azaan, at an event in Shirur, earlier today pic.twitter.com/IpV35YuIAr
— ANI (@ANI) April 4, 2022
काय म्हणाले होते राज ठाकरे?
राज्य सरकारनं मशिदीवरील भोंगे हटवावेत, अन्यथा त्या भोंग्यापेक्षा अधिक आवाजात समोर हनुमान चालिसा लावण्यात येईल, असं राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या भाषणात म्हटलं होतं. मी प्रार्थनेच्या विरोधात नाही. लोक त्यांच्या घरांमध्ये प्रार्थना करू शकतात. राज्य सरकारला मशिदींवरील लाऊडस्पीकर हटवण्याचा निर्णय घ्यावा लागेल. अन्यथा मशिदींसमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा लावण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला होता.