गृह राज्यमंत्र्यांनी मालमत्ता दडवली!
By admin | Published: July 13, 2015 01:22 AM2015-07-13T01:22:48+5:302015-07-13T01:22:48+5:30
गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी मालमत्ता दडवून निवडणूक आयोगाची फसवणूक केल्याचा आरोप प्रदेश काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.
मुंबई : गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी मालमत्ता दडवून निवडणूक आयोगाची फसवणूक केल्याचा आरोप प्रदेश काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. आरोपाच्या पुष्टयर्थ सावंत यांनी काही कागदपत्रेही पत्रकार परिषदेत सादर केली.
सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, विधान परिषदेचे आमदार होण्यापूर्वी डॉ. पाटील यांनी 2000 मध्ये आपला मुलगा शर्व यांच्या नावाने अकोला येथे सुमारे 5,300 वर्ग मीटर आकाराचा भूखंड खरेदी केला. परंतु मुलाच्या नावामागे वडिल म्हणून स्वत:चे नाव लिहिण्याऐवजी अण्णासाहेब पवित्रकार हे नाव लिहिले. मात्र, उमेदवारी अर्ज भरताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात मुलाच्या नावे कोणतीही मालमत्ता नसल्याचे सांगितले. 2013 मध्ये त्यांनी मुलाच्या नावे असलेला हा भूखंड विक्र ीस काढला. मुलगा अल्पवयीन असल्याने त्यांना त्यासंदर्भात न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करावे लागले. त्यावेळी त्यांनी डॉ. रणजित पाटील आणि अण्णासाहेब पवित्रकार ही एकच व्यक्ती असल्याचे आपल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले. या प्रकरणामध्ये त्यांनी मुलाच्या नावावरील मालमत्ता दडवून निवडणूक आयोगाची फसवणूक केल्याचे स्पष्ट होते, असेही सावंत म्हणाले.