'मिसेस होम मिनिस्टर' यांचा फोन कॉल देतोय महाराष्ट्र पोलिसांच्या कुटुंबियांना मोलाचा 'आधार'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 02:03 PM2020-07-22T14:03:39+5:302020-07-22T14:19:46+5:30
''हॅलो...मी आरती देशमुख बोलतेय. गृहमंत्र्यांची पत्नी,'' असा फोन गेल्यावर पहिल्यांंदा त्यावर विश्वास बसत नाही.
पुणे : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसदलाचा कुटूंबप्रमुख या नात्याने जास्तीत जास्त पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांशी थेट संपर्क ठेवण्याचे धोरण स्विकारले आहे. गृहमंत्र्यांच्या 'होम मिनिस्टर' असणाऱ्या त्यांच्या पत्नी आरती देशमुख यांनी देखील याच पद्धतीने संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. मात्र त्या बोलतात ते पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पत्नींशी...होय, दररोज राज्यातल्या किमान वीस पोलिस पत्नींशी त्या संवाद साधतात.
''हॅलो...मी आरती देशमुख बोलतेय. गृहमंत्र्यांची पत्नी,'' असा फोन गेल्यावर पहिल्यांंदा त्यावर विश्वास बसत नाही. गृहमंत्र्यांंच्याच पत्नी बोलत असल्याचे लक्षात आल्यानंतर मात्र पोलिस पत्नींच्या भावना अनावर होतात. आपुलकीने आणि वडीलधाऱ्याच्या मायेने आरती देशमुख बोलू लागतात तेव्हा संबंधित पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्याची पत्नी भारावून जाते आणि फोन संपेपर्यंत आत्मविश्वासाने भरून जाते.
कोरोनाच्या संकटाने ड्युटीवर असणाऱ्या राज्यातल्या 87 पोलिसांना आजवर कोरोनाने काळाच्या पडद्याआड नेले आहे. शेकडो पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे ड्युटीवर जाणाऱ्या घरातल्या कर्त्या माणसाबद्दल घरच्यांना काळजी लागून राहते. आरती देशमुख यांनी 'लोकमत'ला सांगितले, ''गृहमंत्री अनिल देशमुख यांनीसुद्धा कोरोना काळात राज्यात 28 जिल्ह्यात दौरा केला. शेकडो लोकांना ते भेटतात. रुग्णालयांमध्ये जातात. अशावेळी पत्नी म्हणून माझ्या मनातही सतत काळजी असते. त्यामुळेच ज्यांच्या घरातील माणूस ड्युटीवर आहे त्यांच्या मनात काय भावना येत असतील याची कल्पना मी करु शकते. यातूनच मला वाटलं की आपण पोलिसांच्या घरातल्या महिलांशी बोललं पाहिजे. त्यांना धीर दिला पाहिजे. याच भावनेतून मी रोज जास्तीत जास्त पोलिसांच्या घरी संपर्क साधण्याचा प्रयत्न करते.''
माझा फोन गेल्यानंतर बहुतेक जणींच्या भावना अनावर होतात. त्यांना रडू कोसळते. ड्युटीवर असणाऱ्याबद्दलची काळजी त्या व्यक्त करतात. ड्युटीवरुन घरी आल्यानंतर त्यांना मुलाबाळांना देखील नीट जवळ घेता येत नाही. ड्युटीवर असताना कुठून संसर्ग होईल याची धास्ती त्यांना असते. आपल्यामुळे माझ्या घरच्यांना कोरोनाची लागण होऊ नये याचीही काळजी त्यांच्या मनात असते. कोरोनानं जीवनच बदलून गेल्याचे त्या सांगतात, असा अनुभव आरती देशमुख यांनी सांगितला. त्यावर मी त्यांना दिलासा देते. तुम्ही एकट्या नाहीत. सरकार, समाज तुमच्या पाठीशी आहे, हे सांगते. यातून त्यांची उमेद वाढते असे त्या म्हणाल्या.