गृह राज्यमंत्री घेणार तपासाचा आढावा
By admin | Published: April 8, 2017 01:58 AM2017-04-08T01:58:54+5:302017-04-08T01:58:54+5:30
लोणावळ्यातील सिंहगड महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुण आणि तरुणीच्या निर्घृण खुनाने लोणावळा व मावळ परिसर हादरला
लोणावळा : लोणावळ्यातील सिंहगड महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुण आणि तरुणीच्या निर्घृण खुनाने लोणावळा व मावळ परिसर हादरला असून, विद्यार्थी व पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचे पडसाद शुक्रवारी विधानसभेमध्येही बघायला मिळाले. लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी या प्रकरणात जातीने लक्ष घालत तपासकामाचा आढावा घेऊन घटनास्थळाला भेट देणार असल्याचे सांगितले.
पर्यटननगरी लोणावळा शहरात शिकण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांसोबत मानवतेला काळिमा फासणारी घटना असल्याने लोणावळेकर सुन्न झाले. सिंहगड महाविद्यालयात शिकणारा सार्थक वाघचौरे व श्रुती डुंबरे या दोघांचा रविवारी रात्री आयएनएस शिवाजीसमोरील डोंगरात एस पॉइंट येथे एका झुडपात डोक्यात दगड घालून व बेदम मारहाण करुन खून करण्यात आला होता. (वार्ताहर)
पोलिसांच्या हातात काही महत्त्वाचे धागेदोरे लागल्याचे निश्चित सांगितले जात असले, तरी या संदर्भात फार गोपनीयता पाळली जात असून, केवळ तपास सुरू आहे एवढेच उत्तर दिले जात आहे. या भीषण हत्याकांडाचा विषय शुक्रवारी विधानसभेमध्येही उचलला गेला. सभागृहात मांडलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना गृह राज्यमंत्री केसरकर यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासाचा आढावा घेणार असल्याचे सांगितले. पोलीस आॅनर किलिंगपासून एकतर्फी प्रेम, प्रेमाचा त्रिकोण अशा तपासून बघत आहेत.