गृहमंत्र्यांनी केले शहिद परिवारांचे सांत्वन
By admin | Published: May 13, 2014 11:33 PM2014-05-13T23:33:09+5:302014-05-13T23:38:42+5:30
चामोर्शी तालुक्यातील मुरमुरी, पावीमुरांडा भागात रविवारी नक्षलवाद्यांनी भूसुरूंग स्फोटात पोलीस दलाचे वाहन उडविले. या घटनेत सात पोलीस जवान शहीद झाले
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील मुरमुरी, पावीमुरांडा भागात रविवारी नक्षलवाद्यांनी भूसुरूंग स्फोटात पोलीस दलाचे वाहन उडविले. या घटनेत सात पोलीस जवान शहीद झाले तर दोन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. राज्याचे गृहमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आर. आर. पाटील यांनी मंगळवारी गडचिरोली येथे येऊन भूसुरूंग स्फोट झाला त्या घटनास्थळाला भेट दिली.
यावेळी त्यांनी या ठिकाणची सर्व परिस्थिती पोलीस दलातील अधिकारी व जवान यांच्याकडून जाणून घेतली. घटनेच्या दोन दिवस आधी या परिसरातील जंगलात सी-६0 पथकाचे कमाडंट इंदरशहा सडमेक यांच्या नेतृत्वात पोलीस पथक अभियान राबवित होते. त्या कमाडंटने आज घटनास्थळावर पालकमंत्र्यांना घटनेची सर्व हकीगत कथन केली. ज्या ठिकाणाहून नक्षलवाद्यांनी भूसुरूंग स्फोटाचा घोडा दाबला त्या जागेवरही गृहमंत्री गेलेत. संपूर्ण परिसराची त्यांनी पाहणी केली. त्यानंतर पालकमंत्री चामोर्शी येथे दाखल झाले. येथे त्यांनी शहीद पोलीस जवान रोशन डंबारे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर देसाईगंज तालुक्यातील कुरूड येथील शहीद जवान दुर्योधन नाकतोडे यांच्या परिवाराचीही पालकमंत्र्यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर गडचिरोली येथे पोलीस मुख्यालयात सी-६0 पोलीस पथकातील जवानांचा दरबार गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी पोलीस जवानांच्या अडचणी त्यांना अभियानादरम्यान येत असलेल्या समस्या आदी गृहमंत्र्यांनी जाणून घेतल्या. यावेळी अनेक जवानांशी त्यांनी चर्चा केली. पोलिसांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, असा विश्वास गृहमंत्र्यांनी व्यक्त केला. एक तास हा दरबार चालला. त्यानंतर जिल्ह्यात प्रमुख विभागाच्या अधिकार्यांची पालकमंत्री आर. आर. पाटील यांनी पोलीस मुख्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीत सर्व विभागाच्या अधिकार्यांकडून सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला. यावेळी राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाल, विशेष पोलीस महानिरिक्षक रवींद्र कदम, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी रणजीतकुमार, पोलीस अधीक्षक सुवेज हक व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)