घरच्यांना नकोशी झालेली माणसं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2016 02:36 AM2016-09-18T02:36:53+5:302016-09-18T02:36:53+5:30

अनेक प्रश्न येथील मनोरुग्णालयातील बरे झालेले रुग्ण तेथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना करीत आहेत.

Homeless people ... | घरच्यांना नकोशी झालेली माणसं...

घरच्यांना नकोशी झालेली माणसं...

Next

प्रज्ञा म्हात्रे,

ठाणे- माझा भाऊ मला कधी घ्यायला येणार... माझ्या नवऱ्याला माझी आठवण येत नाही का... माझ्या आईला मला भेटायचं आहे हो... असे एक ना अनेक प्रश्न येथील मनोरुग्णालयातील बरे झालेले रुग्ण तेथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना करीत आहेत. मात्र, तिच्या भावाने दिलेला मोबाइल कायम स्वीच आॅफ आहे, तर तिच्या नवऱ्यानं बदललेल्या घराचा पत्ता कळवलेला नाही. आईला भेटायला आतुर असलेल्या मुलीला घ्यायला उद्या येतो, असं सांगणाऱ्या वडिलांचा उद्या उजाडतच नाही.
ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयातील साडेतीनशेहून अधिक रुग्ण नातेवाइकांच्या प्रतीक्षेत आहेत. यापैकी ६० टक्के रुग्ण बरे झाले असतानाही त्यांचे नातेवाईक त्यांना घरी घेऊन जाण्यासाठी येत नसल्याची शोकांतिका आहे. चिंतेची बाब म्हणजे यात महिला रुग्णांची संख्या अधिक आहे.
ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात १५०० हून अधिक रुग्ण असून यातील ३७१ रुग्ण हे दीर्घ कालावधीपासून दाखल आहेत. त्यापैकी बरे झालेले रुग्ण घरी जायला उत्सुक आहेत. आम्ही इथून कधी परत जाणार, आम्हाला घरी न्यायला कुणी का येत नाही, आम्ही आता बरे झालो असताना आम्हाला इथेच राहण्याची सक्ती का, अशी प्रश्नांची सरबत्ती ते करतात. पण, त्यांचे रक्ताचे नातेवाईक त्यांना पूर्णपणे विसरले आहेत. त्यांची साधी विचारपूस करायला ते वर्षानुवर्षे फिरकले नाहीत, तर यांना कोणाच्या ताब्यात देणार, असा यक्षप्रश्न मनोरुग्णालयासमोर उभा आहे.
बरे झालेल्या रुग्णांनी खूप तगादा लावल्यावर त्यांना घेऊन जाण्यासाठी मनोरुग्णालयाकडून त्यांच्या नातेवाइकांना फोन केल्यावर मोबाइल आउट आॅफ कव्हरेज एरिया असतो. क्वचित, एखादा फोन उचलला गेला तर आम्ही उद्या किंवा परवा येऊ, पण आज वेळ नाही, असं सांगितलं जातं. पण, तो उद्या उगवत नाही. चुकीचा मोबाइल क्रमांक आणि बदललेला घरचा पत्ता अशा अनेक कारणांमुळे अनेकांचे परतीचे दोर कापले गेले आहेत. एखादीला उंबरठ्यापाशी आलेला मृत्यू सोबत येण्याकरिता खुणावत असतो... मात्र, तिला तिच्या नवऱ्याला शेवटचं भेटण्याची आस लागलेली असल्याने कुडीतला प्राण घुटमळतो... मात्र, तिची ती भेटीची तळमळ अस्वस्थ करणारी आणि विसरता न येणारी असते...
>२६५ महिला, १०६ पुरुष पाहताहेत वाट
मनोरुग्णालयात दीर्घ काळापासून असलेल्या रुग्णांमध्ये महिला रुग्णांची संख्या अधिक असून त्यामध्ये २६५ महिला, तर पुरुषांची संख्या १०६ आहे. २० वर्षांपेक्षा अधिक काळ रुग्णालयात दाखल असलेल्या महिलांची संख्या १२८, तर पुरुषांची संख्या ३७ आहे, अशी माहिती रुग्णालयाने दिली.

Web Title: Homeless people ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.