घरमालकाचा खून करणारा गजाआड
By admin | Published: April 29, 2016 01:33 AM2016-04-29T01:33:42+5:302016-04-29T01:33:42+5:30
घरमालकाच्या डोक्यात लोखंडी शस्त्राने वार करून खून करणाऱ्या सराईत गुन्हेगारास भारती विद्यापीठ पोलिसांनी गजाआड केले आहे
पुणे : घरफोडी करून घराबाहेर झोपलेल्या घरमालकाच्या डोक्यात लोखंडी शस्त्राने वार करून खून करणाऱ्या सराईत गुन्हेगारास भारती विद्यापीठ पोलिसांनी गजाआड केले आहे. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यांत दरोडा, खुनाचा प्रयत्न असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. विरार पोलीस ठाण्यात महाराष्ट्र संंघटित गुन्हे अधिनियम (मोक्का) गुन्ह्यामध्ये तो मागील आठ वर्षांपासून फरारी आहे.
संदीप ऊर्फ संदीपा ऊर्फ जयकुल नमाशा भोसले (वय २८, रा. वडकीनाला, ता. हवेली, मूळ रा. गुनवरे, ता. फलटण) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या गुन्ह्यात त्याच्यासोबत असलेले साथीदार अद्याप फरारी आहेत. कात्रज येथे राहणारे तानाजी नाना टकले (वय २७, रा. दुर्गा हिल्स, अंजलीनगर) यांचा खून करण्यात आला होता. ही घटना दि. ३ एप्रिल रोजी पहाटे ३ ते ७ या वेळेत घडली होती. घटने वेळी टकले हे रात्री घराबाहेर झोपले होते. त्या वेळी संदीप व त्याच्या एका साथीदाराने घराचा कडी-कोयंडा उचकटून त्यांच्या घरात चोरी केली. या वेळी टकले यांना जाग आली असता संदीपने त्यांच्या डोक्यात वार करून खून केला, अशी माहिती परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी दिली.
पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहायक पोलीस आयुक्त मिलिंद मोहिते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शेखर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक उत्तम बुदगुडे, पोलीस कर्मचारी प्रदीप गुरव, विनोद भंडलकर, प्रवीण काळभोर, समीर बागसीराज, बाबा नरळे तसेच पोलीस मित्र चंद्रकांत मोरे, सचिन लिम्हण यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
>या घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे गुन्ह्याचा तपास सुरू केला. बारामती, मोरगाव, सुपा, जेजुरी, सासवड, फलटण, पणदरे, निंबळक, वाजेगाव, गुनवरे, दहीवडी, खटाव, दौंड, यवत, लोणी-काळभोर, या भागात फिरून पोलिसांनी गुन्ह्याचा तपास केला. या दरम्यान संदीप हा कानिफनाथ गड परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार चौकशी केली असताना खुनाची कबुली दिली. संदीप हा अभिलेखावरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर दहीवडी, विरार, नालासोपारा या ठिकाणी दरोडा, खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच विरार पोलीस ठाण्यातील मोक्या गुन्ह्यांतर्गत तो ८ वर्षांपासून फरार आहे. नालासोपारा येथील गंभीर गुन्ह्यातही तो आठ वर्षांपासून फरार आहे.