एसआरएतील घरे ५ वर्षांनी विकता येणार; २.५० लाख घरमालकांना होणार फायदा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 06:45 AM2023-12-21T06:45:31+5:302023-12-21T06:45:57+5:30
झोपडपट्टीधारकास एसआरए योजनेतून प्राप्त झालेले घर ताबा मिळाल्यापासून १० वर्षांपर्यंत विकण्यास मनाई होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एसआरए योजनेमधून मिळालेली घरे आता १० वर्षांनी नव्हे, तर पाच वर्षांनी विकता येणार आहेत. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणांतर्गत (एसआरए) बांधल्या जाणाऱ्या घरांच्या विक्रीसाठीची अट शिथिल करण्यात आली आहे.
याविषयीचे विधेयक बुधवारी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आले. त्याचा लाभ राज्यभरातील आणि प्रामुख्याने मुंबईतील २.५० लाख सदनिकाधारकांना होणार आहे. झोपडपट्टीधारकास एसआरए योजनेतून प्राप्त झालेले घर ताबा मिळाल्यापासून १० वर्षांपर्यंत विकण्यास मनाई होती.
सात वर्षांचा प्रस्ताव
- महाविकास आघाडीचे सरकार असल्यापासून बदलाच्या हालचाली सुरू होत्या. त्यावेळी १० वर्षांचा कालावधी कमी करून तो सात वर्षांपर्यंत आणण्यास मंजुरी देण्यात आली होती.
- मागील अधिवेशनात विधेयकही आणण्यात आले होते. मात्र. ते मंजूर करण्यात आले नसल्याने १० वर्षांची अट तशीच कायम राहिली होती.
- नव्या योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांना आळा बसावा यासाठी सदनिकाधारकांच्या आधार क्रमांकाचे संलग्नीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती मंत्री अतुल सावे यांनी दिली.