घरमालकाकडून मुलीवर लैंगिक अत्याचार
By admin | Published: April 30, 2017 03:25 AM2017-04-30T03:25:57+5:302017-04-30T03:25:57+5:30
वडील आणि भावाला मारून घराबाहेर काढण्याची धमकी देत, ५० वर्षीय घरमालकाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना भायखळ्यात घडली.
मुंबई : वडील आणि भावाला मारून घराबाहेर काढण्याची धमकी देत, ५० वर्षीय घरमालकाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना भायखळ्यात घडली. मुलगी आठ महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर, शुक्रवारी हे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणी घरमालक मोहम्मद हसन अब्दुला शेख (५०) या पॉक्सो आणि लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
माझगाव परिसरातील एका झोपडीत तक्रारदार नेहा (नावात बदल) वडील आणि भावासोबत भाड्याने राहते. हे घर शेखच्या मालकीचे आहे. २०१६ मध्ये वडील आणि भाऊ कामानिमित्त घराबाहेर गेले असता, शेखने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास वडील आणि भावाला मारून घराबाहेर काढण्याची धमकी त्याने दिली, तसेच बदनामीची भीती घातली. त्यामुळे मुलगी घाबरून गप्प राहिल्याचे आता उघडकीस आले आहे. (प्रतिनिधी)
अल्पवयीन मुलाकडून चिमुरडीवर अत्याचार
माहीम परिसरात शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ७ वर्षांची चिमुरडी मैदानात खेळत असताना, १५ वर्षांच्या मुलाने तिला निर्जन स्थळी नेत, तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यात ती जखमी झाली आहे. मुलगी घरी आली नाही, म्हणून कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. रात्री उशिराने ती रडत घरी परतली, तेव्हा तिने झालेला प्रकार सांगितला. या प्रकरणी कुटुंबीयांनी माहीम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी मुलाला ताब्यात घेऊन, त्याची रवानगी बालसुधारगृहात केली आहे.