मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांनी वाहिली शिवाजीराव देशमुख यांना श्रद्धांजली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 10:54 PM2019-01-14T22:54:19+5:302019-01-14T22:54:22+5:30
विधानपरिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या निधनाने एक ज्येष्ठ संसदपटू आपण गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुंबई - विधानपरिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या निधनाने एक ज्येष्ठ संसदपटू आपण गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, जिल्हा परिषद सदस्य म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात करणाऱ्या श्री. देशमुख यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून लोकहिताशी जपलेली बांधिलकी लक्षणीय आहे. विशेषत: डोंगरी विकास योजनेच्या माध्यमातून राज्यातील चाळीस तालुक्यांच्या विकासासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार मोलाचा ठरला. तसेच राज्य मंत्रिमंडळाचे सदस्य म्हणून विविध विभागांची जबाबदारीही त्यांनी यशस्वीपणे सांभाळली होती. विधानपरिषदेचे सभापती म्हणून त्यांनी या वरिष्ठ सभागृहाचे प्रदीर्घ काळ केलेले नेतृत्व कायम स्मरणात राहील.
जनसेवेचा आदर्श वस्तुपाठ - नितीन गडकरी
विधानपरिषदेचे माजी सभापती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांच्या निधनाने राजकारणातील एक अजातशत्रू व्यक्तिमत्व आपण गमावले आहे. मी विधानपरिषदेचा सदस्य असताना शिवाजीराव आमचे ज्येष्ठ सहकारी होते. सभापती या नात्याने सभागृहाचे कामकाज चालविताना ते चांगल्या कामाचे कौतुक करायचे आणि काही चुका झाल्या तर संयमी शब्दात कानउघाडणीही करायचे. ‘ग्रामीण भागातील सामान्य माणूस हाच आपल्या राजकारण, समाजकारणाचा केंद्रबिंदू असला पाहिजे’, असे ते आग्रहाने नेहमी सांगायचे. १९६७ च्या कोयनाच्या भीषण भूकंपाच्या वेळी गावकºयांच्या पुर्नवसनासाठी शिवाजीरावांनी केलेले कार्य आम्हा सर्वच लोकप्रतिनिधींसाठी जनसेवेचा आदर्श वस्तुपाठ आहे. राजकारणाच्या पलिकडे जाऊन मैत्री जपणाºया या ज्येष्ठ संसदपटूला माझी विनम्र श्रद्धांजली.
शिवाजीराव देशमुख यांच्या निधनाने ज्येष्ठ मार्गदर्शक हरवला - सुधीर मुनगंटीवार
विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या निधनाने ज्येष्ठ मार्गदर्शक आणि समन्वयी नेतृत्व हरवले आहे अशा शब्दात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत
सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणतात की, राज्याच्या विधानपरिषदेच्या सभापतीपदी बिनविरोध निवडून येण्याची हॅटट्रिक देशमुख यांनी केली होती. काँग्रेस पक्षाचा एक आधारवड म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जायचे. प्रदीर्घ प्रशासकीय अनुभव असलेल्या श्री. देशमुख यांनी शिराळा मतदार संघाचे नेतृत्व केले. गृह, ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य अशा सर्वच विभागांची धुरा त्यांनी यशस्वीरित्या सांभाळली. काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करतांना दायित्वाप्रतीची त्यांची एकनिष्ठता सर्वांनीच अनुभवली. विधान परिषदेचे सभापती म्हणून काम करतांना त्यांचा समन्यायी दृष्टीकोन, राज्य विकासाची तळमळ, निर्णयामागची संवेदनशीलता दिसून आली. त्यांच्या जाण्याने सामाजिक आणि राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती प्रदान करो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
शिवाजीराव देशमुख यांच्या निधनाने निष्ठावंत नेतृत्व काळाच्या पडद्याआड - अशोक चव्हाण
विधानपरिषदेचे माजी सभापती व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष शिवाजीराव देशमुख यांच्या निधनाने एक निष्ठावंत नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले असून आपण एक ज्येष्ठ मार्गदर्शक गमावला आहे, अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
शिवाजीराव देशमुख यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना खा. चव्हाण म्हणाले की, शिवाजीराव देशमुख आयुष्यभर काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले. सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी समाजकार्याला सुरुवात केली. जिल्हा परिषद सदस्य ते विधान परिषद सभापती पदापर्यंतचा त्यांचा प्रवास माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारा आहे. राज्य सरकारमध्ये माहिती जनसंपर्क, पाटबंधारे, अन्न नागरी पुरवठा, ग्रामविकास, कृषी, सहकार अशा विविध खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी राज्याच्या विकासात मोलाचे योगदान दिले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना काँग्रेस पक्षाचे विचार तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवून पक्ष संघटनेला बळकटी देण्याचे कार्य त्यांनी केले. राजकारणासोबत सहकार, कृषी, शिक्षण क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले.