माननीयांचा हट्ट आता बास
By Admin | Published: April 4, 2017 01:05 AM2017-04-04T01:05:54+5:302017-04-04T01:05:54+5:30
गायब होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लाड तसेच नवीन मार्ग व पास केंद्र सुरू करण्याचा माननीयांचा हट्ट यापुढे पुरविला जाणार नाही.
पुणे : राजकीय वरदहस्तामुळे मोक्याच्या पदावर बदल्या, वर्षानुवर्षे एकच पद, लाईट ड्युटी, सततच्या दांड्या, हजेरी लावून दिवसभर गायब होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लाड तसेच नवीन मार्ग व पास केंद्र सुरू करण्याचा माननीयांचा हट्ट यापुढे पुरविला जाणार नाही. राजकीय दबावामुळे घेण्यात आलेले आणि पीएमपीला तोट्यात नेणारे निर्णय रद्द होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या ‘पीएमपी’मध्ये आतापर्यंत राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात होत आला आहे. पीएमटी व पीसीएमटीच्या विलीनीकरणानंतर ‘पीएमपीएमएल’ अस्तित्वात आल्यानंतरही हा हस्तक्षेप कायम राहिला. ‘पीएमपी’च्या संचालक मंडळामध्ये पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर, स्थायी समितीचे अध्यक्ष, तसेच पीएमपीच्या संचालकांचा समावेश असतो. दोन्ही पालिकांकडून ‘पीएमपी’ला संचलन तुटीसह विविध प्रकारे निधी दिला जातो. कंपनी कायद्यानुसार महामंडळाची निर्मिती करण्यात आली असली तरी आतापर्यंत निर्णयप्रक्रियेत दोन्ही पालिकेतील राजकीय नेत्यांची मर्जीच चालत आली आहे. विविध पक्षांचे पदाधिकारी तसेच लोकप्रतिनिधींकडून अधिकाऱ्यांवर दबाव आणून विविध कामे करून घेतली जातात. ‘पीएमपी’ला तोटा सहन करावा लागत असूनही केवळ माननीयांच्या हट्टासाठी ही कामे केली जात होती.
आतापर्यंत माननीयांचा दूरध्वनी किंवा पत्र आल्यानंतर कर्मचाऱ्यांना हवी तिथे नियुक्ती दिली जात होती. चालक-वाहकांना प्रशासनात नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. तसेच त्यांच्यासह रोजंदारीवरील कर्मचारी, हेल्पर यांना पास केंद्र, आगारांमध्ये पाठविण्यात आले आहे. मुंढे यांनी अशा सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ नियुक्तीच्या ठिकाणी पाठविण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासन तसेच आगारांमध्ये काही अधिकारी वर्षानुवर्षे एकाच पदावर कार्यरत आहे. राजकीय पाठिंब्यामुळे त्यांची बदली करण्याचे धाडस कुठल्याही अधिकाऱ्याने केलेले नाही. कर्मचाऱ्यांच्या बाबतीतही हीच स्थिती आहे. पालिकेच्या रुग्णालयातून बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र आणून लाईट ड्युटी तसेच लोकप्रतिनिधींच्या पत्रावरूनही असे काम देण्याची पद्धत पीएमपीमध्ये सुरू आहे. सततच्या दांड्या मारणारे तसेच सकाळी हजेरी लावल्यानंतर दिवसभर गायब होणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही फारशी कारवाई होत नव्हती. वेळेच्या बाबतीत कर्मचाऱ्यांना ढिलाई दिली जात आहे. आता यापुढे हा हस्तक्षेप बंद होण्याची चिन्हे आहेत. मुंढे यांच्याकडून असे हट्ट यापुढे खपवून घेतले जाणार नाहीत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
>नऊ पास केंदे्र बंद
माननीयांंच्या हट्टामुळे सुरू करण्यात आलेली नऊ पास केंद्रे प्रशासनाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या पास केंद्रांवरील पास विक्रीचे प्रमाण अत्यंत कमी होते. या केंद्रांसाठी कर्मचाऱ्यांची चणचण भासत असल्याचे कारण पीएमपी प्रशासनाने दिले आहे. मात्र, केवळ राजकीय दबावामुळे ही केंद्रे सुरू ठेवण्यात आल्याचे समजते. देहूगाव, संभाजीनगर (चिंचवड), सांगवी, बोपोडी, पाषाण, लोअर इंदिरानगर, गालिंदे पथ, वानवडी आणि मगरपट्टा अशी बंद करण्यात आलेल्या पास केंद्रांची नावे आहेत.
>तोट्यातील मार्गही बंद होणार
पीएमपी प्रशासनाने लोकप्रतिनिधींच्या आग्रहास्तव काही नवीन मार्ग सुरू केले आहेत. मात्र, यातील बहुतेक मार्ग तोट्यात चाललेले आहेत. केवळ त्यांच्या आग्रहामुळे पीएमपीने आतापर्यंत मोठा तोटा सहन केला आहे. आता हे तोट्यातील मार्गही बंद होण्याची शक्यता आहे.
>... तर अधिकाऱ्यांच्या बदल्या
तुकाराम मुंढे यांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसह आगारप्रमुखांना मार्गावरील बसेसची स्थिती सुधारण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी युद्धपातळीवर काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, पुढील काही दिवसांत मुंढे यांच्या अपेक्षेप्रमाणे काम न झाल्यास अधिकाऱ्यांचेही निलंबन किंवा बदल्या केल्या जातील, अशी शक्यता आहे.
त्याचप्रमाणे अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांचीही बदली लवकरच होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.