रणरागिणींच्या वेदनेचा हुंकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 04:34 AM2017-08-10T04:34:47+5:302017-08-10T04:35:25+5:30
आझाद मैदानावर बुधवारी भगवा जनसागर लोटला होता. मराठा समाजावरील अन्यायाला वाचा फोडणारी रणरागिणींची भाषणे झाली, त्यांचा हुंकार पाहायला मिळाला.
सचिन लुंगसे
मुंबई : आझाद मैदानावर बुधवारी भगवा जनसागर लोटला होता. मराठा समाजावरील अन्यायाला वाचा फोडणारी रणरागिणींची भाषणे झाली, त्यांचा हुंकार पाहायला मिळाला. आम्ही आज येथे न्याय मागण्यास आलेलो नाही तर न्याय घेण्यास आलो आहोत, असे सांगत त्यांनी मैदान दणाणून सोडले. आर्या माने, प्रचिती सावंत, वैष्णवी डाफ, पूजा मोरे, स्नेहल सपताळ, भावना देशमुख, काजल गुंजाळ, अर्चना भोर, रसिका शिंदे, दिव्या महाले, दिव्या साळुंखे, आकांक्षा पवार आणि सुरेखा गावकर यांनी समाजाची भावना बोलून दाखविली.
प्रारंभी मराठा मोर्चाच्या प्रस्तावनेचे वाचन झाले. कोपर्डी प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यात येईल आणि तातडीने न्याय दिला जाईल, असे आश्वासन सरकारने दिले होते. त्याचे काय झाले, असा सवाल एक तरुणीने केला. आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत. मात्र सरकार काहीच कार्यवाही करत नाही. अत्याचारासारख्या प्रकरणांत जात, धर्म आणि पंथ पाहता कामा नये. केवळ कोपर्डीच नाही, तर अत्याचाराच्या घटनेत आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. आजघडीला अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर केला जात आहे. चुकीच्या प्रकरणांत लोकांना गोवले जात आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे. अशा घटनांचे राजकारण करता कामा नये. मात्र याप्रश्नी सरकार गंभीर नाही.
सरकार म्हणते कायद्याचे राज्य आहे. जर कायद्याचे राज्य असेल तर मग आम्हाला न्याय का मिळत नाही? कायदा नक्की कुठे आहे? दिलेले वचन सरकार का पाळत नाही? मराठा समाज उदारमतवादी आहे. मात्र आमचा गैरफायदा घेऊ नका. आज आम्ही मुंबईत धडकलो आहोत. आणि आता जर आमची दखल घेतली नाही, तर मग आम्ही दिल्ली हादरवून टाकू, असा इशारा त्यांनी दिला.
आता अभ्यास बंद करा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कोणतेही प्रकरण दाखल केले की आम्ही अभ्यास करून हा प्रश्न सोडवू, असे ते म्हणतात. मात्र आणखी किती दिवस तुम्ही अभ्यास करणार. तुमचे गुरुजी नक्की आहेत तरी कोण? असा सवाल एका मुलीने केला.
आम्ही जिजाऊच्या लेकी
आम्ही जिजाऊच्या लेकी आहोत. आम्ही शांत आहोत. मात्र जर आम्ही मनात आणले आणि आक्रमक झालो तर मात्र सरकारला महाग पडेल, असाही इशारा एका संतप्त मुलीने दिला.
‘एक मराठा, लाख मराठा’
प्रत्येकाच्या भाषणाचा शेवट ‘एक मराठा, लाख मराठा...’ने होत होता. ‘मराठा समाजाच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका...’ या वाक्यावर उपस्थित समुदायाकडून टाळ्यांचा गजर झाला.
शिवस्मारकाचे काय झाले
शिवस्मारकाच्या कामाचे भूमिपूजन झाले. मात्र त्यानंतर कामाबाबत सरकारने एक शब्द काढलेला नाही. नक्की काम सुरू झाले आहे का? आणि सुरू झाले असेल तर किती झाले आहे? याबाबत सरकार काहीच बोलत नाही. शिवस्मारकाचे काम लवकर करण्यात यावे, असाही मुद्दा एका मुलीने उपस्थित केला.