लोणीकर यांच्यावर हायकोर्टाचे ताशेरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2017 05:29 AM2017-02-24T05:29:32+5:302017-02-24T05:29:32+5:30
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या दैनंदिन प्रशासकीय कामात अनाठायी हस्तक्षेप करून, या वैधानिक संस्थेस
मुंबई : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या दैनंदिन प्रशासकीय कामात अनाठायी हस्तक्षेप करून, या वैधानिक संस्थेस त्यांच्या सेवेतील एका अभियंत्याची निष्कारण बदली करायला भाग पाडल्याबद्दल, मुंबई उच्च न्यायालयाने राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता खात्याचे मंत्री बबनराव लोणीकर यांच्यावर ताशेरे ओढले आहेत.
लोणीकर यांनी मंत्री म्हणून असलेल्या अधिकारांचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवत न्यायालयाने म्हटले की, राज्यघटनेनुसार शासनव्यवस्थेची जी चौकट अपेक्षित आहे, त्यात जीवन प्राधिकरणासारख्या वैधानिक महामंडळाच्या दैनंदिन प्रशासकीय कामात मंत्र्याने हस्तक्षेप करण्यास कुठेही जागा नाही, तरीही लोणीकर यांनी तसे केले. मंत्री असा अनाठायी हस्तक्षेप करू लागले, तर अशा वैधानिक संस्थांना सुरळीतपणे काम करणे कठीण होईल. भविष्यात लोणीकर अशा प्रकारे अधिकारबाह्य काम करणार नाहीत व सरकारही मंत्र्यांच्या मनमानी इच्छा पूर्ण करण्यासाठी वैधानिक संस्थांना असे बेकायदा आदेश देणार नाही, अशी अपेक्षा न्यायालयाने व्यक्त केली.
जीवन प्राधिकरणातील एक उपअभियंता पांडुरंग बापू पाटील यांची सांगली जिल्ह्यातील तासगाव येथून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथे गेल्या वर्षी २९ आॅक्टोबर रोजी केली गेलेली बदली रद्द करताना, न्या. सत्यरंजन धर्माधिकारी व न्या. बी. पी. कोलाबावाला यांच्या खंडपीठाने भाजपाच्या मंत्र्यावर हे ताशेरे ओढले. पाटील यांना येत्या १० दिवसांत देवगड येथून पदमुक्त करून तासगाव येथे पुन्हा रूजू करून घ्यावे, असे निर्देशही न्यायालयाने दिले. पाटील यांनी बदलीच्या विरोधात रिट याचिका दाखल केल्यावर, जीवन प्राधिकरणाने प्रतिज्ञापत्र सादर करून ही बदली पाणीपुरवठा खात्याच्या सचिवांकडून पाठविण्यात आलेल्या आदेशवजा पत्रामुळे केल्याचे प्रांजळपणे कबूल केले. प्राधिकरणाने न्यायालयास सांगितले की, पाटील यांच्या बदलीस खरं तर कोणतेही समर्थनीय कारण नव्हते किंवा प्रशासकीय गरज म्हणूनही ही बदली गेली गेली नव्हती. केवळ सरकारकडून सांगण्यात आले, म्हणूनच ही बदली केली गेली. (विशेष प्रतिनिधी)