हनीसिंग हाजीर हो..
By admin | Published: January 9, 2015 12:52 AM2015-01-09T00:52:08+5:302015-01-09T00:52:08+5:30
पंजाबी रॅप गायक यो यो हनीसिंगला बयान देण्यासाठी १३ जानेवारी रोजी पाचपावली पोलीस ठाण्यात उपस्थित होण्याचे आदेश सत्र न्यायालयाने गुरुवारी दिलेत.
नागपूर : पंजाबी रॅप गायक यो यो हनीसिंगला बयान देण्यासाठी १३ जानेवारी रोजी पाचपावली पोलीस ठाण्यात उपस्थित होण्याचे आदेश सत्र न्यायालयाने गुरुवारी दिलेत.
हनीसिंगने अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी, तर तक्रारकर्ते आनंदपालसिंग जब्बल यांनी हनीसिंगला अटकपूर्व जामीन देऊ नये यासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. दोन्ही अर्जांवर गुरुवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. सलमान आझमी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, त्यांनी संबंधित पक्षांचे म्हणणे ऐकल्यानंतर हनीसिंगला पाचपावली पोलीस ठाण्यात हजर होण्याचे आदेश दिलेत. हनीसिंगला सशर्त तात्पुरता अटकपूर्व जामीन मिळालेला आहे. हा आदेश पुढील तारखेपर्यंत लागू राहणार आहे.
जब्बल यांच्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी २६ एप्रिल २०१४ रोजी हनीसिंग व नवी दिल्ली येथील बादशाह यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम २९२, २९३ व माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७, ६७-अ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.
पाचपावली पोलीस तक्रार नोंदविल्यापासून हनीसिंगला अटक करण्याच्या प्रयत्नात आहेत. हनीसिंगतर्फे अॅड. अतुल पांडे, जब्बल यांच्यातर्फे अॅड. रसपालसिंग रेणू व अॅड. पवन डेंगे यांनी बाजू मांडली. शासनातर्फे सहायक सरकारी वकील उषा गुजर यांनी बाजू मांडली़ (प्रतिनिधी)
बादशाहची हजेरी
अश्लील गाणी गाण्याचा आरोप असलेला गायक बादशाहने ६ जानेवारी रोजी पाचपावली पोलीस ठाण्यात हजेरी लावून बयान नोंदविले आहे. तो हनीसिंगचा मित्र आहे. बादशाहचे मूळ नाव आदित्य असून त्याचा जन्म दिल्लीत झाला आहे. त्याची गाणी तरुणांमध्ये प्रसिद्ध आहेत. शाहरुख खान त्याचा आवडता अभिनेता आहे. तसेच तो राजाप्रमाणे जगतो. यामुळे हनीसिंगने त्याला बादशाह नाव दिले. तेव्हापासून तो बादशाह नावाने वावरत आहे.