सीरमच्या पुनावाला यांना 'महाराष्ट्र भूषण पुरस्कारा'नं सन्मानित करा, मनसेची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2020 06:19 PM2020-12-30T18:19:09+5:302020-12-30T18:20:22+5:30
Serum Institute : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवरही सीरम इन्स्टिट्यूट तर्फे विकसित करण्यात येत आहे लस.
सध्या भारतात कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी लस विकसित करण्यावर युद्धपातळीवर काम सुरू आहे. अशातच सायरस पुनावाला यांची सीरम इन्स्टिट्यूट ही संस्थादेखील कोरोनावरील लस विकसित करण्याचं काम करत आहे. याव्यतिरिक्त आजवर सीरम इन्स्टिट्यूटनं अनेक रोगांवरील लसीही उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांच्या अनेक वर्षांचं योगदान पाहता सायरस पुनावाला यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कारानं सन्मानित करण्यात यावं अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आली आहे.
मनसेचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते बाळा नांदगावकर यांनी ट्विटरद्वारे ही माहिती केली आहे. "सायरस पुनावाला हे सीरम इन्स्टिट्युटच्या माध्यमातून गेली अनेक दशके विविध रोगांवर लस उपलब्ध करून देत आहेत. या महासाथीतही पूर्ण जगाला त्यांनी लसीचे मोठया प्रमाणात उत्पादन करून मोठा दिलासा दिला आहे. पुनावाला यांचे कार्य हे महाराष्ट्राचे व देशाचे नाव उंचावणारे असेच आहे," असं नांदगावकर म्हणाले. असे भूषणावह कार्य करणाऱ्या सायरस पुनावाला यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात यावं अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
सायरस पुनावाला हे सिरम इन्स्टिट्युट च्या माध्यमाने गेली अनेक दशके विविध रोगांवर लस उपलब्ध करून देत आहेत. या महामारीत सुद्धा पूर्ण जगाला त्यांनी लसीचे मोठया प्रमाणात उत्पादन करून मोठा दिलासा दिला आहे. पुनावाला यांचे कार्य हे महाराष्ट्राचे व देशाचे नाव उंचावणारे असेच आहे.
— Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) December 30, 2020
असे भूषणावह कार्य करणाऱ्या सायरस पुनावाला यांना "महाराष्ट्र भूषण" पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे हि विनंती.
— Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) December 30, 2020
१९६६ मध्ये सायरस पुनावाला यांनी सीरम इन्स्टिट्यूटची स्थापना केली होती. आज अनेक आजारांवरील लस विकसित करण्यात सीरमचा मोठा वाटा आहे. सीरममध्ये सध्या पोलिओ, डायरिया, हेपिटायटिस, स्वाईन फ्लू सारख्या लसीही विकसिक करण्यात येत आहेत. तसंच सध्या कोरोनावरीलही लस विकसित करण्याचं काम सीरममध्ये सुरू असून अत्यंत माफक दरात ही लस सरकारलाही देण्यात येणार असल्याचं यापूर्वी अदर पुनावाला यांनी सांगितलं होतं.