राज्यातील ३ मान्यवरांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान, सामाजिक न्याय मंत्रालयातर्फे गौरव : देशातल्या ११ विविध श्रेणीतील २२ जणांना पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 04:01 AM2017-10-11T04:01:05+5:302017-10-11T04:01:24+5:30
सामाजिक न्याय मंत्रालयातर्फे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते, देशातल्या ११ विविध श्रेणीतील २२ जणांना वयोश्रेष्ठ सन्मान पुरस्काराने गौरवण्यात आले.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : सामाजिक न्याय मंत्रालयातर्फे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते, देशातल्या ११ विविध श्रेणीतील २२ जणांना वयोश्रेष्ठ सन्मान पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यात सातारा जिल्ह्यातील मंगला बनसोडे, नागपूर जिल्ह्यातील डॉ. महादेवराव मेश्राम आणि कोल्हापूरच्या मनोरमा कुळकर्णींचा समावेश आहे. पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र आहे.
लोककलेशी बनसोडे यांचे अतुट नाते
पुण्याच्या जुन्नर तालुक्यात लोकनाट्य व लावणीला समर्पित कुटुंबात जन्मलेल्या मंगला बनसोडे यांच्या कुटुंबाची पाचवी पिढी या क्षेत्रात आहे. श्रीमती बनसोडे लावणी व तमाशा या लोककला माध्यमातून सातव्या वर्षापासून लोकजागृती व सामाजिक संदेश पोहोचवण्याचे काम केले आहे. पुरस्कार प्राप्तीनंतर, या कलेच्या माध्यमातून लावणीचे जतन व संवर्धन करण्याबरोबरच सामाजिक संदेश सर्वदूर पोहोचवण्याचा प्रयत्न अखेरच्या श्वासापर्यंत आपण करणार आहोत, असे बनसोडे म्हणाल्या.
डॉ. मेश्राम यांचे अतुलनीय योगदान
नागपूरच्या उमरेड तालुक्यातील डॉ. महादेवराव मेश्राम यांना आरोग्य सेवेत अतुलनीय योगदान दिल्याबद्दल जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
नागपूरच्या रॉबर्टसन मेडिकल स्कूलमधून आरोग्य सेवेचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर १९५८ साली आरोग्य अधिकारी पदावर रूजू झालेल्या डॉ. मेश्राम यांनी दैनंदिन रुग्णसेवेबरोबर पूरग्रस्त व कुष्ठरोग्यांच्या सेवेचे विशेष उल्लेखनीय कार्य केले. महाराष्ट्र शासनाने १९८२ ते ८५ या कालखंडात त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी विशेष प्रशस्तीपत्रक देऊन पूर्वीच त्यांना सन्मानित केले आहे.
क्रीडा क्षेत्रातील मनोरमा कुळकर्णी
कोल्हापूरच्या मनोरमा कुळकर्णींनी महापालिका शाळेत ३५ वर्षे प्राथमिक शिक्षिकेची नोकरी केली. क्रीडा क्षेत्राची त्यांना विशेष रूची आहे.
धावणे या क्रीडाप्रकारात त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर १ रजत, २ कांस्य, राष्ट्रीय स्तरावर २५ सुवर्ण, ४ रजत, ३ कांस्य व राज्य स्तरावरील स्पर्धेत १३ सुवर्ण, २ रजत पदकांसह अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. याखेरीज १५00 मीटर्स मॅरेथॉनमधे विशेष नैपुण्य संपादन केले.
निवृत्तीनंतरही धावणे या क्रीडाप्रकाराकडे त्यांनी विशेष लक्ष दिले व अनेकांना मार्गदर्शन केले. श्रीमती कुळकर्णी सध्या ७१ वर्षांच्या असून क्रीडा क्षेत्रातील नैपुण्य व विशेष कामगिरीसाठी राष्ट्रपतींच्या हस्ते वयोश्रेष्ठ सन्मान पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला.