लेकीबाळींचा सन्मान करणे हीच आपली संस्कृती-प्रतिभाताई पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 05:29 AM2019-12-19T05:29:37+5:302019-12-19T05:30:00+5:30
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्राच्या वतीने वसंतराव देशपांडे सभागृहात बुधवारी सायंकाळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संविधान ही भारताची गीता व जनसेवा हे मर्म आहे. लेकीबाळी आणि भगिनींचा सन्मान करणे ही आपली संस्कृती आहे, असे प्रतिपादन माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी बुधवारी येथे केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्राच्या वतीने वसंतराव देशपांडे सभागृहात बुधवारी सायंकाळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. त्याला उत्तर देताना त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी विधानसभाध्यक्ष नाना पटोले होते. व्यासपीठावर मंत्री छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल व विलास मुत्तेमवार,देवीसिंह शेखावत आदी उपस्थित होते.
प्रतिभाताई म्हणाल्या, की संवैधानिक पदावर जाताना प्रत्येकालाच शपथ घ्यावी लागते. निधर्र्मी राज्य आणि सर्वधर्मसमभाव जोपासून देशाच्या अखंडत्वासाठी वचनबद्धतेची ती शपथ असते. त्याचे पालन करूनच पदावर काम करावे लागते. वैयक्तिक धर्म पाळणे हा ज्याचा-त्याचा अधिकार आहे, हेच यातून अभिप्रेत आहे. राष्टÑपतिपदाच्या निवडणुकीत मला बिनशर्त पाठिंबा देऊन बाळासाहेबांनी आपले थोरपण दर्शविले होते. ते जुन्यांचे फलश्रुत व नव्या परंपरेचे बीजरूप आहेत. शरद पवार हे देशाच्या पटलावरील मुत्सद्दी नेते व २०१९ या वर्षाचे कर्मवीर आहेत, असा शब्दात प्रतिभाताईंनी दोघांचाही गौरव केला.
प्रतिभाताई मृदू दिसणाऱ्या कणखर नेत्या : शरद पवार
प्रतिभाताई या मृदू दिसणाºया पण कणखर नेत्या आहेत, असा गौरव शरद पवारांनी केला. ते म्हणाले, आपण मुख्यमंत्री असताना विधानसभेत त्यांचा कणखरपणा बरेचदा अनुभवला. सुखोई या वेगवान विमानात बसून प्रवास करणाºया या राष्टÑपतिपदावरील महिलेचा कणखरपणाही जगाने अनुभवला.