शहीद मेजर कौस्तुभ राणे यांचा सेना पदकाने झाला होता सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2018 05:38 AM2018-08-08T05:38:24+5:302018-08-08T05:39:06+5:30
उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेज सेक्टरमध्ये घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत शहीद झालेले महाराष्ट्राचे वीरपूत्र मेजर कौस्तुभ प्रकाश राणे (२९) यांचा प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपतींच्या हस्ते सेना पदकाने सन्मान करण्यात आला होता.
मीरा रोड (ठाणे) : उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेज सेक्टरमध्ये घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत शहीद झालेले महाराष्ट्राचे वीरपूत्र मेजर कौस्तुभ प्रकाश राणे (२९) यांचा प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपतींच्या हस्ते सेना पदकाने सन्मान करण्यात आला होता.
मीरा रोडच्या शीतल नगरमधील हिरलसागर इमारतीत पहिल्या मजल्यावर राणे कुटुंब राहते. ते मूळचे कोकणातील वैभववाडीतील सडूरे गावाचे आहेत. १९८७ पासून ते मीरा रोडमध्ये स्थायिक झाले. मेजर कौस्तुभ याच भागात लहानाचे मोठे झाले. येथील होली क्र ॉस शाळेचे ते विद्यार्थी होते. त्यांचे वडील राणे काका म्हणून परिचित आहेत. वडील दूरसंचार विभागातून तर आई ज्योती या मालाडच्या उत्कर्ष शैक्षणिक संस्थेतून शिक्षिका म्हणून सेवानिवृत्त झाल्या आहेत.
मंगळवारी सकाळीच त्यांची आई गावाला जाण्यास निघाली होती. पण सकाळीच सीमेवर दहशतवाद्यांशी लढताना ते शहीद झाल्याची बातमी आली. त्याची माहिती मिळताच त्यांची आई पनवेलवरूनच माघारी फिरली.
२०१०मध्ये कम्बाईन डिफेन्स सर्व्हिस परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर चेन्नई येथून त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले. २०११मध्ये ते सैन्यात लेफ्टनंट पदावर रु जू झाले. २०१३ मध्ये त्यांना कॅप्टनपदी तर २०१८ मध्ये मेजरपदी बढती मिळाली.
३६ व्या बटालियनमध्ये असणारे मेजर कौस्तुभ सध्या उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेज सेक्टरमध्ये तैनात होते.
>आज पार्थिव आणणार
मेजर कौस्तुभ यांचे पार्थिव बुधवारी विशेष विमानाने मुंबईत आणले जाणार आहे. त्यानंतर मीरा रोड येथील त्यांच्या निवासस्थानी ते अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली.
पाकिस्तानला धडा शिकवा
मेजर कौस्तुभ राणे यांचे हौतात्म्य वाया जाऊ देता कामा नये. असे पराक्रमी लष्करी अधिकारी आणि जवान गमावणे परवडणार नाही. सीमेवर सतत कुरापती काढणारे पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना केंद्र सरकारने कायमचा धडा शिकवला पाहिजे, असे ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली वाहताना सांगितले.