महाराष्ट्राची शान वाढविणारे मान्यवर लोकमततर्फे सन्मानित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2017 04:27 AM2017-04-13T04:27:14+5:302017-04-13T06:29:41+5:30
‘महाराष्ट्राचा मानबिंदू’ हे सार्थ नामाभिधान अभिमानाने मिरवत चांद्यापासून बांद्यांपर्यंत विस्तारलेल्या वर्धिष्णु अशा ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाने मराठी भाषा, मराठी माती आणि महाराष्ट्राची
मुंबई : ‘महाराष्ट्राचा मानबिंदू’ हे सार्थ नामाभिधान अभिमानाने मिरवत चांद्यापासून बांद्यांपर्यंत विस्तारलेल्या वर्धिष्णु अशा ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाने मराठी भाषा, मराठी माती आणि महाराष्ट्राची शान वाढविणाऱ्या विविध क्षेत्रांतील सेवाव्रतींचा गौरव करण्यासाठी आयोजित केलेली सन्मानसंध्या मान्यवरांसह तारे-तारकांच्या उपस्थितीने लखलखून गेली.
गेल्या काही दिवसांपासून उभ्या महाराष्ट्राला उत्सुकता लागून असलेला ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ पुरस्कार सोहळा मंगळवारी सायंकाळी ‘सहारा स्टार’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये दिमाखात पार पडला. आपल्या उत्तुंग कर्तृत्वाने समाजाला दिशा आणि प्रेरणा देण्याचा वसा घेतलेल्या सेवाव्रतींचा गौरव सोहळा ‘याचि डोळा’ अनुभवणे हा एक विलक्षण आनंददायी क्षण होता.
यूपीएल प्रस्तुत लोकमत ‘महाराष्ट्रीयन आॅफ दी इयर’ पॉवर्ड बाय कर्म इन्फ्रास्ट्रक्चर आणि अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे यांच्या सहकार्याने झालेला अत्यंत देदीप्यमान असा हा सोहळा उत्तरोत्तर अधिकच रंगत गेला. देशाचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांची खास उपस्थिती, यंदाचा सोहळा उंचीवर घेऊन गेली. भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना त्यांच्या सार्वजनिक जीवनातील ५० वर्षांच्या कारकिर्दीकरिता ‘जीवनगौरव’, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘पॉलिटिकल ट्रान्सफॉर्मर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तो या विलोभनीय सन्मानसंध्येचा कळसाध्याय ठरला. लोकमत समूहाचे चेअरमन विजय दर्डा, लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा, सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा आणि कार्यकारी संचालक करण दर्डा यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
आपल्या कर्तृत्वाने, परिश्रमाने, साधनेने आणि संशोधनाने ज्यांनी महाराष्ट्राची शान वाढविली अशा विविध १४ क्षेत्रांतील मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहिलेल्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वांचा गौरव होताना, उपस्थितांनी टाळ्यांचा गजर करत पुरस्कारविजेत्यांचे कौतुक केले.
प्रख्यात नृत्यांगना शर्वरी जेमनिस आणि त्यांच्या संचाने सादर केलेल्या गणेश वंदनेने या सोहळ्याचा शुभारंभ झाला. लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी आपल्या प्रास्ताविकात या पुरस्कार सोहळ्यामागची भूमिका विषद करत सर्वच कॅटेगरीतील नॉमिनींच्या कर्तृत्वाचा आवर्जुन उल्लेख केला. अंध शाळेच्या विद्यार्थ्यांनी मलखांबावर केलेल्या कसरती पाहून उपस्थित ‘मेस्मराइज’ झाले, तर फ्युजन आॅफ आॅडिओ व्हिज्युअल आर्ट सादर करणाऱ्या चमूने ‘लोकमान्य’ आणि ‘लोकमत’ यांचा सुरेख मेळ साधला. सांयकाळी सहा वाजता सुरू झालेला हा सन्मान सोहळा उत्तरोतर वाढत जात रात्री दहाच्या सुमारास पार पडला. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. तब्बल पावणेतीन तास रंगत गेलेल्या या सोहळ्यास गृहमंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह मंत्रीगणांची शेवटपर्यंत असलेली उपस्थिती खास वैशिष्टयपूर्ण ठरली.
राजकीय मांदियाळी
या कार्यक्रमाला केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट, महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सहकारमंत्री सुभाष देशमुख, सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, जलसंधारणमंत्री राम शिंदे, सार्वजनिक बांधकाम (उपक्रम)मंत्री एकनाथ शिंदे, पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मंत्री सुरेश शेट्टी, माजी मंत्री कृपाशंकर सिंह, भाजपाचे मुंबई अध्यक्ष आ. आशिष शेलार, आ. अनिल परब, आ. पराग आळवणी, आ. निरंजन डावखरे, आ. प्रणिती शिंदे आदींसह अनेक राजकीय नेते उपस्थित होते.
यंदाच्या चौथ्या पुरस्कार पर्वात "लोकसेवा-समाजसेवा", "परफॉर्मिंग आर्ट््स", "कला", "क्रीडा", ‘रंगभूमी’, ‘मराठी चित्रपट’, "उद्योग", ‘पायाभूत सेवा’, "राजकारण", "प्रशासन (आश्वासक)" आणि "वैद्यकीय" अशा चौदा क्षेत्रांचा समावेश करण्यात आला होता. विशेष म्हणजे, या १४ पुरस्कारांच्या व्यतिरिक्त स्पर्धेच्या पलीकडे जाणारे उत्तुंग कर्तृत्व सिद्ध केलेल्या सहा महनीय व्यक्तींचा विशेष पुरस्काराने गौरव करण्यात आला.
जगभरातील वाचकांनी ‘लोकमत’च्या वेबसाइटवर मतदानाद्वारे दिलेली पसंती, तसेच ११ नामवंत ज्युरींचा कौल यांच्या एकत्रित विचारातून या पुरस्काराचे मानकरी ठरले. जगभरातील तब्बल दोन दशलक्ष वाचकांनी या मतदानात सहभागी होत १४ कॅटेगरीतील नामांकनांसाठी दीड कोटी मते नोंदविली.
जीवनात महत्त्वाकांक्षा नव्हती, स्वार्थ नव्हता. सदैव राष्ट्रसेवा हेच ब्रीद होते. त्यामुळे देशातील जनतेनेच मला राष्ट्रपती बनवले. जनतेच्या आशीर्वादात ताकद असते. मी त्यांच्या सदैव ऋणात राहीन. ‘लोकमत’च्या छोट्याशा रोपट्याचा आज वटवृक्ष झाल्याचे पाहून मनस्वी आनंद होत आहे.
- प्रतिभाताई पाटील, माजी राष्ट्रपती
येत्या दोन-तीन वर्षांत महाराष्ट्र बदलेला दिसेल. २०१९ साली तुम्ही मागे वळून पाहाल, तेव्हा ‘लोकमत’ने दिलेल्या या पुरस्काराला मी पात्र ठरल्याचे तुम्हाला जाणवेल.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री