म्हाडाची बोगस साइट बनविणारा गजाआड
By admin | Published: April 24, 2015 01:56 AM2015-04-24T01:56:59+5:302015-04-24T01:56:59+5:30
म्हाडाचे बनावट संकेतस्थळ बनवून त्याद्वारे अनेकांची फसवणूक करणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनीअरला सायबर पोलीस ठाण्यातल्या अधिकाऱ्यांनी दिल्लीतून गजाआड केले
मुंबई : म्हाडाचे बनावट संकेतस्थळ बनवून त्याद्वारे अनेकांची फसवणूक करणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनीअरला सायबर पोलीस ठाण्यातल्या अधिकाऱ्यांनी दिल्लीतून गजाआड केले. राजेशकुमार तिवातिया (२७) असे आरोपीचे नाव असून, त्याने गेल्या दीडेक वर्षात ७०हून अधिक शासकीय, खासगी संस्थांची बनावट संकेतस्थळे तयार केल्याची माहिती सायबर पोलिसांच्या प्राथमिक चौकशीतून पुढे आली आहे.
मुंबईतल्या घरांच्या सोडतीची जाहिरात नुकतीच म्हाडाने सर्व वृत्तपत्रांमध्ये दिली होती. सोडतीतली घरे मिळविण्यासाठी म्हाडाच्या संकेतस्थळावर अर्ज येणार होते. मात्र या अधिकृत संकेतस्थळासोबत एक बोगस पण हुबेहूब संकेतस्थळ आहे आणि त्यावर असंख्य अर्ज येऊन पडत आहेत ही माहिती मिळताच म्हाडाने सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. एसीबी नंदकिशोर मोरे, वरिष्ठ निरीक्षक सुनील घोसाळकर आणि पथकाने या प्रकरणाचा तांत्रिक तपास सुरू केला. तपासात हे संकेतस्थळ दिल्लीतून हाताळण्यात येत असल्याची माहिती मिळताच सायबर पोलिसांचे एक पथक तेथे रवाना झाले. त्यांनी राजेशकुमारच्या मुसक्या आवळल्या. चौकशीत त्याने याशिवाय आणखीही अनेक बोगस संकेतस्थळे तयार केल्याची कबुली दिली. जास्त हिट्स मिळणाऱ्या संकेतस्थळांना गुगलकडून जाहिराती दिल्या जातात. जाहिरातीद्वारे पैसे कमावण्याच्या नादात त्याने हा गुन्हा केल्याची माहिती पुढे येत आहे. दरम्यान, या प्रकरणात त्याच्या साथीदारालाही पोलिसांनी अटक केली आहे. (प्रतिनिधी)