राज्याला हुडहुडी
By Admin | Published: December 6, 2014 03:22 AM2014-12-06T03:22:53+5:302014-12-06T03:22:53+5:30
उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्याने चांगलाच वेग पकडल्याने राज्यातील प्रमुख शहरांचे किमान तापमान घसरले आहे
मुंबई : उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्याने चांगलाच वेग पकडल्याने राज्यातील प्रमुख शहरांचे किमान तापमान घसरले आहे. शुक्रवारी राज्यात सर्वात कमी किमान तापमान नांदेड येथे १० अंश सेल्सिअस एवढे नोंदविले असून, राज्यातील प्रमुख शहरांचे किमान तापमानदेखील ११ ते १२ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत असल्याने राज्याला हुडहुडी भरली आहे.
नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी राज्यातील प्रमुख शहरांसह मुंबईच्या किमान तापमानाचा पारा खाली घसरला होता. मात्र मध्यंतरी बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या वाऱ्याला अडथळा निर्माण झाला होता. परिणामी राज्यातील प्रमुख शहरांच्या किमान तापमानात वाढ झाली होती. परंतु आता पुन्हा थंड वाऱ्याचा जोर वाढला आहे. मुंबई शहरात मात्र दिवसा चटके देणारे ऊन आणि रात्री गारवा, असे दुहेरी वातावरण अनुभवास येत आहे. शिवाय गेल्या दोन दिवसांत मुंबईच्या किमान तापमानात ३ अंशांनी वाढ झाली आहे. शुक्रवारी शहराचे किमान तापमान तापमान २३ अंश सेल्सिअस एवढे नोंदविले आहे. (प्रतिनिधी)