हुंदके आणि हास्याच्या लकेरीने भिंतीही सुखावल्या
By admin | Published: April 24, 2017 03:09 AM2017-04-24T03:09:33+5:302017-04-24T03:09:33+5:30
एखाद्या क्षणिक चुकीपायी कारागृहात जीवन जगावं लागत असलेल्या येरवडा कारागृहातील कैद्यांची, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांबरोबर भेट
पुणे : एखाद्या क्षणिक चुकीपायी कारागृहात जीवन जगावं लागत असलेल्या येरवडा कारागृहातील कैद्यांची, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांबरोबर भेट घालून देण्याचा उपक्रम शनिवारी आयोजित करण्यात आला. मुलांशी गळाभेट होताना अनेकांनी हुंदके दिले. त्याचबरोबर, आपल्या चिमुरड्यांना पाहून हास्याची लकेरही उमटत होती. आप्तेष्टांना पाहून कैद्यांना आनंदाश्रू आवरत नव्हते.
कारागृहात वर्षानुवर्षे शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांची नातेवाईकांशी भेट घालून देण्यासाठी येरवडा मध्यवर्ती कारागृह प्रशासनाच्या वतीने दोन वर्षांपासून ‘गळाभेट’ उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. पाच वर्षांहून अधिक कालावधीसाठी शिक्षा भोगत असलेल्या सुमारे २७५ पुरुष कैद्यांनी आणि २५ महिला कैद्यांनी मुले व नातेवाईकांना भेटण्याची इच्छा प्रशासनाकडे व्यक्त केली होती. कारागृह प्रशासनाने कैद्यांची ही मागणी मान्य केली.
कैद्यांनीही आपल्या मुलांना भेटण्याची जय्यत तयारी केली होती. कारागृहात केलेल्या कामाच्या पैशांतून कारागृहाच्याच कॅन्टीनमधून विविध खाद्यपदार्थ खरेदी करून आणले होते. कारागृहाच्या सांस्कृतिक सभागृहात कैदी बसले होते. मुलांना खाऊ भरवताना, कैद्यांचे पाणावलेले डोळे पाहून इतर उपस्थितांनाही गहिवरून आले होते. कैद्यांची लहान मुले वडिलांच्या मांडीवर बसून त्यांच्याशी गप्पा मारण्यात दंग झाली होती.
अनेकांनी मुलांना प्रथमच पाहिले होते. त्यामुळे बहुतांश जण मुलांना मांडीवर घेऊन बसले होते. त्यांचे पापे घेत होते. मुलेही आपल्या वडिलांशी गप्पा मारत होती. (प्रतिनिधी)