हुक्का पार्लरची जाहिरातबाजी

By admin | Published: June 27, 2017 03:02 AM2017-06-27T03:02:08+5:302017-06-27T03:02:08+5:30

स्मोकिंग किल्स बट हुक्का चिल्स, दोन पॉटवर एक मोफत, या आॅफरच्या जाहिराती इन्स्टाग्रॅमसह सोशल मीडियावर झळकू लागल्या आहेत

Hookah parlor promotionalism | हुक्का पार्लरची जाहिरातबाजी

हुक्का पार्लरची जाहिरातबाजी

Next

नामदेव मोरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : स्मोकिंग किल्स बट हुक्का चिल्स, दोन पॉटवर एक मोफत, या आॅफरच्या जाहिराती इन्स्टाग्रॅमसह सोशल मीडियावर झळकू लागल्या आहेत. नियम धाब्यावर बसवून हुक्का पार्लरचे चालक बिनधास्तपणे जाहिरातबाजी करून तरुणाईला व्यसनांच्या जाळ्यात अडकवत आहेत. रात्री उशिरापर्यंत बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या या व्यवसायावर पोलीस, महापालिका व अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी कडक कारवाई करत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
अनधिकृत हुक्का पार्लरविरोधात ‘लोकमत’ने आवाज उठविल्यानंतर पोलिसांनी धाडसत्र सुरू केले होते; परंतु ही कारवाई दिखाव्यापुरतीच असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये बिनधास्तपणे हुक्का पार्लर सुरू आहेत. तंबाखूजन्य पदार्थांची जाहिरात करण्यास मज्जाव असताना हुक्का पार्लरच्या बाहेर बिनधास्तपणे होर्डिंग लावून ग्राहकांना आकर्षित केले जात आहे. हुक्का पार्लरमध्ये जाणाऱ्यांमध्ये तरुणाईची संख्या ९५ टक्के आहे. महाविद्यालयीन तरुण विशेषत: ११वी व १२वीचे विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात हुक्का पार्लरमध्ये जात असल्याचेही निदर्शनास येऊ लागले आहे.
पूर्वी वाढदिवसानिमित्त हॉटेलमध्ये पार्टीची मागणी केली जात होती. आता हॉटेलऐवजी हुक्का पार्लरला पसंती दिली जाऊ लागली आहे. हे लक्षात घेऊन हुक्का पार्लरच्या चालकांनी सोशल मीडियावरून जोरदार जाहिरातबाजी सुरू केली आहे. नेरुळमधील शानदार नेही इन्स्टाग्रामद्वारे तरुणाईला आमंत्रण देण्यास सुरुवात केली आहे. स्मोकिंग किल्स बट हुक्का चिल्स. रमझान निमित्त आॅफर १ पॉट ३०० रुपये, दोन पॉटर ६०० रुपये, बाय टू अ‍ॅण्ड गेट वन फ्री, ग्रॅब युवर हुक्का अ‍ॅट शानदार ही जाहिरात तरुणाईला आकर्षित करत आहे. अनेकांनी सोशल मीडियावरून तरुणाईला आमंत्रणे देण्यास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी वयोगटाप्रमाणे वेळ निश्चित करून दिली आहे. नेरुळमधील एका हुक्का पार्लरमध्ये ११ व १२वीमधील विद्यार्थ्यांसाठी दुपारी १ ते ३ वाजेपर्यंतची वेळ ठेवण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत युवक-युवती हुक्का पार्लरमध्येच असल्याचे चित्र दिसू लागले आहे. महाविद्यालयीन तरुणाई पूर्णपणे हुक्काच्या अधीन जाऊ लागली आहे. तरुणाईला हुक्का ओढणे प्रतिष्ठेचे वाटू लागले आहे. अनेकांनी सोशल मीडियावरून हुक्का ओढतानाचे फोटो व व्हिडीओ इतर मित्रांना पाठविण्यास सुरुवात केली आहे. महाविद्यालयामध्ये हुक्का पार्लरविषयी उघडपणे चर्चा सुरू आहे. तरुणाई व्यसनांच्या आहारी जात असून हे थांबविण्यासाठी पोलिसांनी नियमबाह्यपणे व्यवसाय करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

Web Title: Hookah parlor promotionalism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.