अकरा लाखांचा गुटखा पकडला
By admin | Published: February 7, 2017 05:07 AM2017-02-07T05:07:40+5:302017-02-07T05:07:40+5:30
जिल्ह्यातून नेण्यात येत असलेला ११ लाखांचा गुटखा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला, या वेळी १४ लाखांचा ट्रकही हस्तगत करण्यात आला आहे.
हिंगोली/बासंबा : जिल्ह्यातून नेण्यात येत असलेला ११ लाखांचा गुटखा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला, या वेळी १४ लाखांचा ट्रकही हस्तगत करण्यात आला आहे. यातील तस्कर नांदेड जिल्ह्यातील असून त्यांनी आंध्र प्रदेशातून हा गुटखा आणल्याचा संशय आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्याबाहेरून गुटख्याची आवक वाढल्याची माहिती होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पाळतीवर होते. नांदेडहून गुटखा घेऊन ट्रक हिंगोलीकडे निघाल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून खानापूर चित्ता परिसरातील एका ढाब्यासमोर रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास हा ट्रक पकडला. त्यात तब्बल दहा लाख ८० हजारांचा गुटखा आढळून आला. यात नजारे गुटख्याची ३० पोती, जांभळ्या पट्ट्याच्या गुटख्याची २५, तर लाल रंगाच्या गुटख्याची २५ पोती आढळून आली.
१४ लाख रुपयांच्या ट्रकसह एकूण २४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल या वेळी हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी सोमवारी बालाजी विश्वनाथ वड्डेवाड (रा. नरसी नायगाव), माधव मारोती बोईनवाड (रा. वारंगवाडी, ता.मुदखेड, जि.नांदेड) या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. (प्रतिनिधी)