जुन्नरमध्ये आशा बुचकेंच्या बंडखोरीमुळे शिवसेना-राष्ट्रवादीत चुरस ?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 12:46 PM2019-10-23T12:46:37+5:302019-10-23T14:50:25+5:30
शिवसेना उमेदवार सोनवणे आणि बंडखोर आशा बुचके यांच्यातील लढाईमुळे अतुल बेनके निघण्याची शक्यता आहे. राज्यात अनेक ठिकाणी शिवसेनेला बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. अगदी हाच मुद्दा विरोधकांच्या पथ्यावर पडत असून जुन्नरमध्ये बंडखोरीचा फायदा कोणाला होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठऱणार आहे.
मुंबई - विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने भारतीय जनता पक्षासोबत निवडणुकीला सामोरे जाण्याचे निश्चित केल्यांनंतर राज्यात बंडखोरी उदंड झाली होती. युती होताच, उभय पक्षांमध्ये बंडखोरांनी उमेदवारी दाखल करण्यावर जोर दिला. भाजपविरुद्धच्या बंडखोरांचे बंड काही प्रमाणात शांत करण्यात आले असले तरी शिवसेनेविरुद्धच्या बंडखोरांना रोखण्यात युतीला यश आले नाही. याचा सेनेला अनेक मतदारसंघात फटका बसण्याची शक्यता आहे.
विरोधीपक्षातून आलेले नेते आणि स्वपक्षातील नेत्यांचं नियोजन करण्यात भाजप आणि शिवसेनेचा चांगलाच कस लागला. शिवसेनेतील नेत्यांनी बंडाचा झेंडा फडकवत उमेदवारी अर्ज सादर केले. अशीच काहीशी स्थिती जुन्नर मतदार संघात होती. मनसेचे आमदार शरद सोनवणे शिवसेनेत आले. त्यामुळे आशा बुचके यांच्या उमेदवारीचा मुद्दा संपुष्टात आला.
दरम्यान बाहेरून आलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिल्यामुळे नाराज झालेल्या बुचके यांनी अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. बुचके यांच्या उमेदवारीमुळे सेनेच्या मतांमध्ये मोठ्या प्रमाणात विभाजन होणार आहे. याचा फटका सरळ-सरळ शिवसेनेला बसणार आहे. तर फायदा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अतुल बेनके यांना होणार अशी चिन्हे आहेत.