हमीदच्या सुटकेची पालकांना आशा
By Admin | Published: February 1, 2016 02:48 AM2016-02-01T02:48:40+5:302016-02-01T02:48:40+5:30
पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयात खटल्याला तोंड देत असलेल्या हमीद अन्सारी याच्या पालकांना आपल्या एकमेव अपत्याच्या सुटकेचा कवडसा दिसत आहे
डिप्पी वांकाणी, मुंबई
पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयात खटल्याला तोंड देत असलेल्या हमीद अन्सारी याच्या पालकांना आपल्या एकमेव अपत्याच्या सुटकेचा कवडसा दिसत आहे. अंधेरीत वास्तव्यास असलेले निहाल अन्सारी आणि फौजिया अन्सारी यांचा हमीद हा एकमेव मुलगा. हमीदच्या आईवडिलांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची मुंबईत भेट घेतल्यानंतर, त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
२०१२ पासून बेपत्ता असलेल्या हमीदचा ठावठिकाणा त्याचे आईवडील घेत असून, त्यांच्या वतीने पेशावरच्या न्यायालयात हेबियस कॉर्पस याचिका दाखल करण्यात आली आहे व त्या याचिकेला प्रतिसाद देताना संरक्षण मंत्रालयाने हमीद अन्सारी आमच्या ताब्यात असल्याचे त्यांना कळविले आहे. हमीदची आई फौजिया अन्सारी या लेक्चरर असून, सरकारने दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्या खूपच समाधानी आहेत व हमीद निश्चितच भारतात परत येईल, अशी त्यांना खात्रीही आहे.
हमीद अन्सारी नोव्हेंबर २०१२ मध्ये अफगाणिस्तानची सीमा ओलांडून व्हिसा नसतानाही पाकिस्तानात गेला. हमीद तेथे आदिवासी मुलीची सुटका करण्यासाठी गेल्याचा दावा त्याच्या पालकांनी केला आहे. या आदिवासी मुलीच्या कुटुंबीयांचे ज्यांच्याशी वैर आहे, ते मिटविण्यासाठी तिचे लग्न करून दिले जात होते. १० नोव्हेंबर २०१२ पासून हमीद पूर्णपणे बेपत्ता असून, त्याच्या शोधासाठी त्याचे पालक या कार्यालयाकडून त्या कार्यालयाकडे खेटे घालत आहेत. ‘आम्ही सुषमा स्वराज दोन दिवसांच्या दौऱ्यावर आल्या असताना घाटकोपरमध्ये त्यांची भेट घेतली. त्या आमच्याशी जवळपास १५ मिनिटे चर्चा करीत होत्या व त्यांनी पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांना हमीदची भेट घेण्यास सांगेन व ते अधिकारी हमीदचे माझ्याशी बोलणे करून देतील, असेही आश्वासन स्वराज यांनी आम्हाला दिले,’ असे फौजिया अन्सारी म्हणाल्या.
फौजिया अन्सारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘हमीदला भारतात आणू, असे सुषमा स्वराज यांनी आश्वासन दिले आहे. मला आता सरकार त्याला खात्रीने परत आणेल असे वाटते,’ असे फौजिया म्हणाल्या.