Cabinet Expansion: अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्ताराची आशा मावळली; मुख्यमंत्र्यांनी केले तात्पुरते 'खातेवाटप'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2022 10:55 AM2022-12-11T10:55:40+5:302022-12-11T10:56:40+5:30
शिंदे गटातील आमदारांमध्ये सुरू असलेली चलबिचल, बच्चू कडू यांच्याकडून व्यक्त करण्यात आलेली नाराजी, यामुळे हिवाळी अधिवेशनाआधी विस्तार हाेईल, अशी जोरदार चर्चा होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत:कडील खात्यांचे वाटप अधिवेशनाआधी अन्य मंत्र्यांकडे केल्याने, विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आता मावळली आहे. यामुळे सत्ता स्थापनेच्या पाच महिन्यांनंतर तरी विस्तार हाेईल, याकडे डोळे लावून बसलेल्या आमदारांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.
शिंदे गटातील आमदारांमध्ये सुरू असलेली चलबिचल, बच्चू कडू यांच्याकडून व्यक्त करण्यात आलेली नाराजी, यामुळे हिवाळी अधिवेशनाआधी विस्तार हाेईल, अशी जोरदार चर्चा होती. गुजरातच्या निवडणुकांनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे १२ डिसेंबर रोजी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला उपस्थित राहतील. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहाही उपस्थित असतील आणि या दौऱ्यादरम्यानच मंत्रिमंडळ विस्तारावर शिक्कामोर्तब होईल, असेही तर्क लढविले जात होते. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडील खात्यांचा कारभार अन्य मंत्र्यांकडे सोपविल्याने, आता अधिवेशनाआधी विस्ताराच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
अशी सोपविली खाती
nपरिवहन आणि सार्वजनिक बांधकाम - शंभूराज देसाई
nपणन - दादाजी भुसे
nसामाजिक न्याय व विशेष साहाय्य - संजय राठोड
nमृद व जलसंधारण
- तानाजी सावंत
nअल्पसंख्यांक विकास
- अब्दुल सत्तार
nपर्यावरण आणि सामान्य प्रशासन
- दीपक केसरकर
nमदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन - संदीपान भुमरे
nमाहिती व जनसंपर्क
- गुलाबराव पाटील