दारूबंदीच्या मतपत्रिकेवर उभ्या-आडव्या बाटलीचे चिन्ह
By admin | Published: July 28, 2016 01:04 AM2016-07-28T01:04:21+5:302016-07-28T01:04:21+5:30
दारूबंदीसाठीच्या मतदानात आता मतपत्रिकेवर उभ्या-आडव्या बाटलीचे चिन्ह देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या संदर्भात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे
अहमदनगर/पारनेर : दारूबंदीसाठीच्या मतदानात आता मतपत्रिकेवर उभ्या-आडव्या बाटलीचे चिन्ह देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या संदर्भात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर, लगेचच हा निर्णय घेण्यात आला.
अण्णांनी दारूबंदीसाठी आंदोलन केल्यानंतर, २००२ साली शासनाने काढलेल्या आदेशात दारूबंदीसाठीच्या मतपत्रिकेवर उभ्या-आडव्या बाटलीचे चिन्ह देण्याची तरतूद होती. मात्र, २००८च्या आदेशात हे चिन्ह वगळण्यात आले. ‘मद्यविक्री अनुज्ञप्ती चालू ठेवावी किंवा बंद करावी,’ असा लेखी पर्याय या मतपत्रिकेत असतो. त्यामुळे अशिक्षित महिलांना मतदान करताना अडथळा येतो व दारूविक्रेत्यांचा फायदा होतो, असा अण्णांचा आक्षेप होता. यासाठी अण्णांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. बैठकीला उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व या विभागाचे आयुक्त उपस्थित होते. दारूबंदीसाठी ज्या गावात मतदान होईल, तेथे आता मतपत्रिकेवर हे चिन्ह देण्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले.
अण्णांच्या पारनेर तालुक्यातील निघोज गावात रविवारी दारूबंदीसाठी मतदान होणार आहे. बावनकुळे यांनी पारनेरच्या तहसीलदारांशी संपर्क साधून, त्यांना मतपत्रिकेवर चिन्ह टाकण्याबाबत आदेश दिले आहेत. कोपर्डीत अत्याचार व खून प्रकरणात आरोपीने नशेतच हे कृत्य केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. दारूमुळेच अत्याचाराच्या घटना घडतात, याकडे अण्णांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. (प्रतिनिधी)
दारूबंदी मतपत्रिकेत आडव्या बाटलीचे चिन्ह काढून टाकल्याबद्दल आपण हा महिलांवरील अन्याय असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. राज्य उत्पादन शुल्क विभागाचा खोडसाळपणाही उघड केला. मुख्यमंत्री, संबंधित मंत्री व सचिवांच्या बैठकीत सुधारित आदेश काढण्यात आला.
- अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक